नगर -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात अखेर नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय 36) याच्याविरुध्द सोमवारी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात सात साक्षीदार, व्हायरल क्लिपचा अहवाल असे पुरावे आहेत.
तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी नगरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हे दोषारोपपत्र दाखल केले आहे. छिंदमविरुध्द दोषारोपपत्र तयार करण्यात आले होते. परंतु ते दाखल करण्यासाठी गृहविभागाची परवानगी आवश्यक होती.
तोफखाना पोलीस ठाण्याने गृहविभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी मागितली होती. गेल्या दीड वर्षांच्या काळानंतर हे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाल्यानंतर दोन दिवसांत 60 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात सात साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहे.
कलम 295 (अ)नुसार राष्ट्रपुरुषाविषयी अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखविणे, कलम 153 कलमानुसार धार्मिक भावना दुखविण्याच्या उद्देश्याने व्यक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करणे, 298 कलमानुसार धार्मिक भावना दुखविणे या कलमानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अपशब्द वापरलेली क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ती क्लिप व छिंदमच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. नाशिक येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत क्लिप व आवाजाचे नमुने तपासण्यात आले. त्यात क्लिपमधील आवाज हा छिंदमचा असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून मिळाला होता. हा महत्त्वाचा पुराव्याचा अहवाल ही दोषारोपपत्राला जोडण्यात आलेला आहे.
फेब्रुवारी 2018 मध्ये भाजपमध्ये व उपमहापौरपदावर असलेल्या छिंदमने महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी फोन वर बोलत होता. त्या वेळी छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द वापरले होते. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे राज्यभर संताप उसळला होता. याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली होती.