नवी दिल्ली – छत्तीसगडमधील आमदार भीमा मंडावी यांच्या हत्या प्रकरणात एनआयएने 33 माओवाद्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे. जगदालपुर येथील एनआयए विशेष न्यायालयात हे आरोपपत्र काल सादर करण्यात आले.
ज्या 33 जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे त्यातील सहा जण अटकेत असून 22 जण फरारी आहेत.
9 एप्रिल 2019 रोजी छत्तीसगड मधल्या दंतेवाडा जिल्ह्यात श्यामगिरी गावात भूसुरूंगाचा स्फोट करून तसेच अंदाधुंद गोळीबार करून आमदारांची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेत छत्तीसगड सशस्त्र दलाचे चार जवानही शहीद झाले होते.
17 मार्च 2020 ला एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. माओवाद्यांनी त्या भागातील निवडणूक प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी आमदार मंडावी आणि अन्य राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता. माओवाद्यांचा म्होरक्या बडा देवा याच्या नेतृत्वाखालील गटाने या कटाची अंमलबजावणी केली.