पुणे – शालेय शिक्षण विभागातील प्रमुख कार्यालयांच्या प्रभारी संचालकांना “डिस्चार्ज’ देण्यात येणार आहे. याबरोबरच संचालकांची रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी केली आहे. यामुळे संचालकांच्या स्पर्धेत असलेल्या इच्छुक अधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
चालू शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून महत्त्वाच्या विभागांमधील संचालकांची पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्तच पडली आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे आहे. बालभारतीच्या संचालकांचा अतिरिक्त कार्यभार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ.शकुंतला काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालक पदांची प्रभारी सूत्रे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांच्याकडे देण्यात आली आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक सुनिल चौहान कौटुंबिक अडचणींमुळे सतत प्रदीर्घ रजेवर जात असतात. यामुळे त्यांचा अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याकडे देण्यात आला आहे. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे महापलिका शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांच्याकडे आहे.
शालेय शिक्षणमंत्री विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवस पुणे शहरात होते. सोमवारी (दि.12) विद्या प्राधिकरणातील कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद झाली. यात संचालकांच्या रिक्त पदांबाबत पत्रकारांशी त्यांना प्रश्न विचारले. त्यावर संचालकांची रिक्त पदे भरण्यातील तिढा सोडविण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
अतिरिक्त कारभाराचा ताण
प्रभारी संचालकांना मूळ विभागातील कामाचाच खूप ताण आहे. अतिरिक्त कार्यभारामुळे त्यात आणखी वाढ झाली आहे. यातून सुटका कधी होणार, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे व रिक्त पदांवरील नियुक्त्यांचे प्रकरण मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांच्या स्तरावरच प्रलंबित पडले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.