नवी दिल्ली: कर्नाटकात गाजत असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या आयएमए घोटाळ्याप्रकरणी मुख्य सुत्रधार मन्सुर खानसह अन्य 24 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी आठ दिवसांचा तपासानंतर बंगळूरू येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात चार्टशिट दाखल करण्यात आली आहे.
आयएमए घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार मन्सूर खान याला 21 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. हा घोटाळा उघडकीस येताच तो दोन आठवडयांपूर्वी भारताबाहेर पळून गेला होता. मात्र त्याला दुबई येथे अटक करण्यात येऊन शुक्रवारी भारताच्या ताब्यात देण्यात आले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून त्याच्याकडून अनेक नावांचा गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्नाटकचे राजकीय क्षेत्र हादरून जाण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास दलाची स्थापना केली आहे. हा घोटाळा साधारणतः 4 हजार कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येते. खान याच्या 17 कंपन्यांनी भरमसाठ लाभाचे आमिष दाखवून सुमारे 1 लाखांहून अधिक लोकांकडून मोठ्या रकमा जमा केल्या. प्रथम काहीजणांना ठरल्याप्रमाणे पैसे देण्यात आले. मात्र, नंतर लोकांची हजारो कोटी रुपायांची फसवणूक करण्यात आली. या फसवणूक झालेल्यांमध्ये प्रामुख्याने मुस्लीमांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.