120 कोटी रुपयांचा चरस पुण्यात जप्त

31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई


गोवा, बंगळुरू, मुंबई आणि पुण्यात विक्री


मनालीमध्ये निर्मिती : बॉलिवूड कनेक्‍शन तपासणार

पुणे – आगामी 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 34 किलो चरस जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 120 कोटी रुपये इतकी आहे. हे चरस पुण्यात मनालीवरुन आणण्यात आले होते. येथून ते गोवा, मुंबई, बंगळुरू आणि पुणे शहरात विक्रीसाठी पाठवले जाणार होते. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी इतर राज्यातील पोलिसांशी संपर्क केला असून त्याचे बॉलिवूड कनेक्‍शनही तपासले जाणार आहे. याप्रकरणी दोन तस्करांना जेरबंद करण्यात आले आहे.

यातील एक तस्कर मनालीतील प्रसिध्द ट्रान्सपोर्ट आणि हॉटेल व्यावसायिक आहे. ललितकुमार दयानंद शर्मा (49, रा. व्हिलेज शमशी) व कौलसिंग रुपसिंग सिंग (40, रा. बद्रोल, जिल्हा कुलू, हिमाचल प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

आयपीएस व्हॉट्‌सअप ग्रुपवरून पर्दाफाश
यासंदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी सांगितले, “आमच्या काही आयपीएस अधिकाऱ्यांचा व्हॉट्‌स ऍप ग्रुप आहे. माझ्या हिमाचल प्रदेशातील बॅचमेटने मनालीवरुन मोठ्या प्रमाणात चरस पुण्यात दाखल होणार असल्याची माहिती दिली होती. यावर आम्ही अनेक दिवस नजर ठेऊन होतो. यासाठी चार पथके तयार करण्यात आली होती. दिल्लीवरुन येणाऱ्या प्रत्येक ट्रेनवर नजर ठेवण्यासाठी चार पोलीस अधिकारी व 45 पोलीस अंमलदार ठेवले होते.

दरम्यान, 19 डिसेंबर रोजी रात्री दोघे आरोपी रेल्वे उतरुन रेल्वे स्थानकाजवळील वाडिया पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. त्यांची झडती घेतली असता, 34 किलो 404 ग्रॅमचे चरस पकडण्यात आले. त्याची किंमत 1 कोटी 3 लाख 64 हजार रुपये इतकी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार ही किंमत 120 कोटी इतकी आहे. ही कारवाई अपर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मुंबई पोलीस एक ग्रॅमसाठी एक हिरोईन पकडतात
“मुंबई पोलीस एक ग्रॅम अंमली पदार्थासाठी एक हिरोईन पकडतात. आम्ही तब्बल 34 किलो चरस पकडले आहे. मात्र, याचे बॉलिवूड कनेक्‍शन आम्ही तपासणार नाही, ते तपासण्यासाठी संबंधित शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती दिली आहे. ते त्याचा योग्य पद्धतीने शोध घेतील, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

पुणे शहरातून इतर राज्यांत विक्री
आरोपींनी मनालीहून ट्रान्सपोर्ट वाहनांच्या सायलेंसरमध्ये लपवून हे चरस दिल्लीला आणले. तेथून ते ट्रेनव्दारे पुण्यात आणले. येथून 34 किलोपैकी 22 किलो चरस मुंबई, 5 किलो गोवा, 5 किलो बंगळुरू आणि दोन किलो पुणे शहरात विक्री करण्यासाठी पाठवले जाणार होते. एक ग्रॅम चरस बाजारात तीन ते पाच हजारांना विकले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.