लुधियाना –कॉंग्रेसने आज आपला पंजाबातील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला असून, विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनाच पक्षाने ही संधी देऊ केली आहे. पंजाबात मुख्यमंत्रिपदासाठी नवज्योतसिंग सिद्धू, सुनील जाखड यांचीही नावे चर्चेत होती, पण चन्नी यांचे नाव राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आज या सर्व नेत्यांच्या एकजुटीने चन्नींचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांचे लुधियानात आगमन झाले, त्यावेळी त्यांची गाडी सुनील जाखड हे चालवत होते व याच गाडीत चन्नी व सिद्धू हे नेतेही बसले होते. पक्षातील ऐक्य अधोरेखित करण्यासाठी ही रचना केली गेली होती, असे सांगण्यात येत आहे.
आज सकाळीच सिद्धू यांनी राहुल गांधी यांचे पंजाबात स्वागत करणारे ट्विट प्रसारित केले होते, त्यात त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत राहुल गांधी जो निर्णय देतील तो मान्य करण्याची निसंदिग्ध ग्वाही दिली होती. चरणजीत चन्नी यांनीही पक्षाकडून जे नाव जाहीर होईल त्याला पाठिंबा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
मुख्यमंत्रिपदासाठी चन्नी आणि सिद्धू यांच्यात जोरदार चुरस होती. त्यातच सुनील जाखड यांनीही आपल्या नावालाही पक्षात पसंती असल्याचे म्हटल्याने ही स्पर्धा आणखीनच तीव्र बनली होती. त्यामुळे राहुल गांधी कोणाचे नाव जाहीर करणार आणि ते नाव जाहीर झाल्यानंतर बाकीचे दोन नेते सहजासहजी गप्प बसणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण पक्षाने आज हा पेच सहजपणे संपुष्टात आणला आहे.
पक्षाने सर्व्हे करून चन्नींचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. पंजाब युवक कॉंग्रेसने या ऐक्याचे आणि चन्नी यांच्या निवडीचे स्वागत करतानाच कॉंग्रेसमधील ही एकजूटच पक्षाला पुन्हा विजयाकडे घेऊन जाईल, असे म्हटले आहे.