बारामतीत छावण्या चालविणाऱ्या संस्था अडचणीत : सरकारकडून पैसे मिळण्याची अपेक्षा
बारामती – वर्षभरात ओल्या व सुक्या दुष्कळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला; मात्र यासाठी ज्या उपाययोजना करण्यात आल्या, ज्या संस्थांनी ही कामे केली त्यांना मात्र आपल्या पैशांसाठी सरकारकडे खेटे मारण्याची वेळ आली आहे. बारामतीचे नेते आणि ठाकरे सरकार बनविण्यात मोलाची भूमिका घेणाऱ्या शरद पवार यांच्या बारामती तालुक्यात उन्हाळ्यात चारा छावण्या चालविणाऱ्या विविध संस्थांची सुमारे आठ कोटी रुपये थकबाकी आहे. हे पैसे आता तरी तातडीने मिळतील अशी अपेक्षा या संस्थांना आहे.
- उन्हाळ्यापासून सप्टेंबरअखेर सुरू होत्या छावण्या
दुष्काळात होरपळलेल्या जनावरांना व चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चारा छावण्यांमुळे दिलासा मिळाला होता. बारामती तालुक्यातील 18 हजार 230 जनावरे चारा छावण्यांमध्ये दाखल होती. या छावण्यांचे एकूण 7 कोटी 89 लाख 92 हजार शासनाकडे थकबाकी आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न चारा छावण्या उभारल्याने सोडविणे शक्य झाले; मात्र हा प्रश्न सोडविणाऱ्या संस्थांची कोटींची बिले अडकल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत.
- पैशांसाठी सरकारदरबारी खेटे मारण्याची वेळ
दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शासन निर्णयान्वये जनावरांच्या चारा छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मान्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कालावधी गृहीत धरुनच जनावरांच्या चारा छावण्या सप्टेंबरअखेर सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.
या संस्थांची आहे थकबाकी…
धो. आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने उंडवडी भागात उभारलेल्या चारा छावणीमध्ये एकूण 1400 जनावरे दाखल होती. त्यापैकी ट्रस्टला शासनाकडून 38 लाख रुपये येणे थकबाकी आहे.
माळेगाव कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या कजहावागज, सावळ, ढाकाळे येथील चारा छावण्यांमध्ये एकूण 2 हजार 480 जनावरे दाखल होती. त्यापैकी जुलै महिन्याचे 10 लाख 87 हजार रुपये कारखान्याला मिळाले आहेत. तर एकूण 1 कोटी 87 लाख 58 हजार रुपयांचे बिल शासनाकडे थकीत आहे.
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजार समितीच्या वतीने सुरू असलेल्या छावणीमध्ये एकूण 1450 जनावरे दाखल होती. या छावण्यांचे बाजार समितीला जुलै महिन्याचे 27 लाख 20 हजार 872 रुपये मिळाले आहेत. तर ऑगस्ट, सप्टेबर अखेर 64 लाख 72 हजार 978 रुपये शासनाकडे थकीत आहेत.
बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, दूध संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये एकूण 2 हजार 900 जनावरे दाखल होती. त्यापैकी जळगाव येथे 1 हजार 700 जनावरे, पळशी येथे 1200 जनावरे छावण्यांमध्ये दाखल होती. दूध संघाचे शासनाकडून चारा छावणीच्या बिलापोटी अडीच कोटी रुपये येणे आहे.
सोमेश्वर सहकारी साखर काखान्याच्या मुर्टी, सुपे, देऊळगाव रसाळ व आंबी येथे 4 छावण्या सुरू होत्या. यामध्ये एकूण 10 हजार जनावरे दाखल होती. यामध्ये आंबी येथील चारा छावणीचे दोन महिन्याचे तर अन्य
3 छावण्यांचे तीन महिन्यांचे एकूण अडीच कोटी रुपये येणे आहे.