शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत मिळेना
पुणे – पुणे जिल्हा माध्यमिक वेतन पथक कार्यालयाच्या कामकाजामध्ये गेल्या दोन वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या एक तारखेस वेतन अदा करण्याचे शासनाचे आदेश असूनदेखील बऱ्याचदा शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेस झालेले नाही. वेतन पथक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी शाळेतील कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन करत असून शाळेतील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत त्यांना योग्य ते मागदर्शन करीत नाहीत.
पुरवणी वेतन देयके, वैद्यकीय बिलांच्या फाईल वेतन पथक कार्यालयामधून गहाळ होत आहेत. रजा रोखीकरण बिले वेळेत मंजूर न करता ती प्रलंबित ठेवली जात आहेत. शालार्थ प्रणालीत वेतन देयक तयार करण्यासाठी दरमहा आवश्यक सूचना परिपत्रकाद्वारे न देता काही ठराविक मध्यस्थांनाच दिल्या जात आहेत. याबाबत काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्यास त्याचे निरसन वेतन पथक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी न करता वेतन पथक कार्यालयाशी संबंधित व्यक्तीला भेटून काम करून घेण्यास सांगितले जात आहे. भविष्य निर्वाह निधी, कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढण्यास टाळाटाळ करणे, प्रकरणे मंजूर झाली तरी त्याच्या रक्कमा वेळत दिल्या जात नाहीत.
अंशदायी पेन्शनची हिशोब पत्रके तयार होऊन सुद्धा त्यावर सह्या न करणे व ती संबंधित कर्मचाऱ्यांना वितरीत न करणे या सारख्या अनेक समस्यांना शाळेतील लिपिक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून संघटनेकडे बऱ्याचदा तक्रारी आल्या आहेत, असे पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाचे सचिव शिवाजी खांडेकर स्पष्ट केले आहे.
कारभार सुधारण्याच्या पुन्हा सूचना देणार
माध्यमिक वेतन पथकाच्या कार्यालयातील कारभारात सुधारणा व्हावात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेतन व इतर प्रकरणे प्रलंबित राहू नयेत यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी सांगितले.
तीव्र आंदोलन करणार
माध्यमिक वेतन पथक कार्यालयातील गलथान कारभाराबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांना भेटून लेखी तक्रार केली जाणार आहे. पुणे शहर व ग्रामीण वेतन पथक अधीक्षकांचे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. येत्या दहा दिवसांत वेतन पथक कार्यालयाच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाचे सचिव तथा राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिला आहे.