निधीची तरतूद असून अनुदान पडून
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कुष्ठरोग, मनोरुग्णांना अर्थसाह्य योजनेमधून तरतूद आहे. आरोग्य विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे रुग्णांना वेळेत निधी मिळत नाही. त्यांना सहा-सहा महिने अनुदानाची प्रतिक्षा करावी लागते. याकडे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
नगर – नगर शहरातील कुष्ठरोग रुग्णांना पोषणासह उपचारासाठी शासनाकडून महापालिकेच्या माध्यमातून 1 हजार रुपये अर्थसाह्यनिधी उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शहरातील एकाही कुष्ठरोग रुग्णांना या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. रुग्णांना एक तर तुटपुंजे अनुदान मिळत असताना त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागात खेट्या माराव्या लागत आहे.
महापालिका हद्दीत 167 कुष्ठरोग पीडित रुग्ण आहेत.
नुकतीच जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी कुष्ठरोग रुग्णांना अनुदान मिळत की नाही याबाबत माहिती घेतली होती. त्यावेळी आरोग्याधिकाऱ्यांनी अनुदानाचे वाटप वेळत होत असल्याचे सांगून वेळ मारून नेली. प्रत्यक्षात मात्र गेल्या सहा महिन्यांपासून 167 कुष्ठरोग रुग्णांना अनुदानासाठी खेट्या माराव्या लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
कुष्ठवसाहतीतील रहिवाशांच्या अडीअडचणी, विकास योजनांची अंमलबजावणी याबाबत नियमित आढावा घेऊन शासनाच्या सर्व उपलब्ध योजनांचा लाभ प्राधान्याने मिळवून द्यावा, यासाठी महापालिकेने प्रयत्न केले पाहिजे.
मात्र असे न होता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कुष्ठरोग रुग्णांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. कुष्ठरोग रुग्णाला आजही समाजात हीन वागणूक दिली जाते. कुष्ठरोगाची बाधा आपल्याला देखील होऊ शकेल, अशी भीती कुष्ठरोग रुग्णाच्या भोवतालच्या लोकांच्या मनात असते. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम राबवणे गरजेचे आहे.
तसेच या रुग्णांना पोषण व उपचारासाठी दिले जाणारे 1 हजार रुपये तुटपुंजे अनुदान गेल्या सहा महिन्यांपासून अद्यापही दिले गेले नाही. त्यामुळे रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागात चकरा मारण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे.