नात्यांचे बदलते स्वरूप

हल्ली जगभरामध्ये प्रेमाचे, प्रेम व्यक्‍त करण्याचे दिवस मोठ्या उत्साहाने साजरे होताना दिसतात. हा अमुक दिवस प्रेमाचा, तो तमुक दिवस मैत्रीचा एवढंच काय तर आपल्या आई, वडिलांबाबतचे आपल्या मनातील प्रेम व्यक्‍त करण्यासाठी देखील दिवस ठरवून देण्यात आले आहेत. परंतु खरंच विचार केला तर लक्षात येतं की हे सगळं मृगजळ आहे. विशेषत:तरुण मुला-मुलींमधे हे प्रमाण प्रकर्षानं जाणवतं. यातील किती लोक या नात्यांच्या बाबतीत गंभीर असतात?

गांभीर्याने विचार केला तर जास्तीत जास्त उत्तरे ‘नाही’ अशीच मिळतील आणि फक्‍त या विशिष्ट नात्यातच नाही, तर सर्वच नात्यांमधे आजकाल एक विलक्षण दुरावा आढळून येतोय. खरंच नातं नातं म्हणजे काय असतं हो? आई-मुलगा, बहीण -भाऊ, वडील-मुलगी, प्रियकर-प्रेयसी हे त्यांचे काही प्रकार. परंतु आजकालच्या युगामधे या नात्यांमधलं पावित्र्य म्हणावं तितकं नक्‍कीच राहिलं नाहीये. जे आई वडील लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ करतात त्यांना त्यांचीच मुले वृद्धाश्रमाची वाट दाखवायला लागलेत ही खरोखरीच खूप मोठी शोकांतिका आहे. अशाने पालक व मुलांमधील दुरावा वाढतोय हे नक्‍की.

यासारखंच, किंबहुना याहून अधिक गुंतागुंतीचं नातं म्हणजे प्रियकर प्रेयसी… बदलते विचार, आजूबाजूचे वातावरण. पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभाव अशी अनेक कारणे या गुंतागुंतीमागे आहेत. माझ्या मते किशोरवयीन मुला-मुलींमधे एकमेकांबद्दल आकर्षण असणं ही साहजिक गोष्ट आहे, परंतु याचे नात्यात रूपांतर होत असताना एक उद्दिष्ट स्पष्टं हवं, ते म्हणजे लग्न…परंतु हेच जास्तीत जास्त प्रकरणांत दिसत नाही आणि याचा कुठे ना कुठेतरी प्रभाव पडतोय त्या नात्यातील विश्‍वासार्हतेवर! आपल्या आजूबाजूला अनेक मुले-मुली प्रियकर प्रेयसी म्हणून मिरवताना दिसतात, पण हीच जोडपी जर पुढे जाऊन नवरा बायको झाली, तर ते नातं पूर्णत्वाला जाईल असं मला वाटतं.

नात्यांचा आणखी एक प्रकार म्हणजे मानलेली नाती. एखाद्या मुलाला आपला भाऊ, मुलीला आपली बहीण, अनाथांना आपले पाल्य. गरजू वृद्धांना आपले आईवडील मानणं, हे या नात्यांतील प्रकार. बऱ्याचदा हे बोललं जातं की मानलेली नाती रक्‍ताच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ असतात, आणि हे खरं आहे यात तीळमात्रही शंका नाही मित्रांनो… कधी यातलं एखादं नातं आजमावून तर पाहा, आपल्या आणि त्यांच्या आयुष्यातील ती लहानशी पोकळी भरुन निघाल्याची जाणीव होईल आणि यासारखं निरपेक्ष, निष्पाप आणि निरागस नातं क्‍वचितच अनुभवायला मिळेल.

या आणि अशा अनेक नात्यांमुळेच आज आपल्या चेहऱ्यावरचं हास्य आणि जीवनातील आनंद अबाधित आहे.तर मित्रांनो सुरुवात करुया आपल्यापासून,संकल्प करुया की माणसे जोडत राहू,त्यांच्याशी नवनवीन नाती निर्माण करु, नात्यांतील ओलावा टिकवून ठेवू आणि सर्वात महत्त्वाचं, कितीही गैरसमज झाले तरी आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ..!!!

– उत्कर्ष देशपांडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.