बदलत्या जीवनशैलीचे आजार (भाग २)

बदलत्या जीवनशैलीचे आजार (भाग १)

दीपक महामुनी

बदलत्या जीवनशैलीचे शारीरिक परिणाम जसे आहेत, तसेच मानसिक परिणामदेखील आहेत. मुख्य म्हणजे भावनात्मक शेअरिंग कमी झालंय, नकारात्मक शेअरिंग वाढलंय. त्यामुळेच स्ट्रोक, ऍसिडिटी, हायपरटेन्शन, मधुमेह इ. ही यादी लांबणारी आहे. प्रेशर कुकरचा व्हॉल्व जाम झाल्यावर होतं तसं आपलं झालं आहे, मग हा कोंडलेला राग बाहेर काढता येत नाही. तो मुलं, बायको, वृद्ध आई-वडील यांच्यावर घरी निघतो.

सर्वात क्‍लासिकल गाइड म्हणजे बॅक टू बेसिक. आपण कोठे थांबायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. एक लाख पगाराऐवजी हजार पगार मिळणार असेल आणि घरी दोन तास जास्त मिळणार असतील तर काय स्वीकारायचं हे स्वत:लाच ठरवावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे जीवनशैलीतला बदल हा केवळ कोणत्याही एका वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनशैलीतील या बदलांनी आणि त्यामुळे होणाऱ्या विकारांनी लिगभेद, वर्गभेदाच्या भिंतीदेखील पाडून टाकल्या आहेत.

पुरुषांच्या बरोबरीनेच महिला देखील सर्वच क्षेत्रांत मोठया प्रमाणात कार्यरत आहेत. अर्थातच कामाबरोबरच आहार-विहाराचे तोटे त्यांनादेखील सोसावे लागत आहेत. तर दुसरीकडे जंक फूड म्हणताना केवळ पिझ्झा-बर्गरलाच टारगेट केलं जातं, पण वडा-पाव, समोसा असे अस्सल भारतीय पदार्थदेखील शरीरात साखर, फॅट, तेल वाढवत असतात. जीवनाच्या शर्यतीत टिकून राहणं हा आजचा अविभाज्य घटकच बनला आहे. जगण्याची शर्यत झाली आहे. मग या धकाधकीत आम्ही चार घटका मौजमजा करायचीच नाही का? यावर सर्वच तज्ज्ञांचं एकमत आहे ते म्हणजे हे खाणं शक्‍यतो टाळाच.

एखाद्या दिवशी महिन्यातून काही खाल्लं तर ठीक, पण ते खातानादेखील नियंत्रण असावं लागेल. अशी आचार-विचार-आहार शैली अंगी बाणवणं अवघड असलं तरी कठीण नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. थोडक्‍यात काय तर वेगवान स्पर्धेत धावणाऱ्या आजच्या पिढीला स्वत:च्या निरोगी भविष्यासाठी थोडा तरी ब्रेक लावावाच लागेल. आपण जी जीवनशैली जगत आहोत त्याचा परिणाम तरुणाईला भोगावा लागणार आहे. खाण्या-पिण्याच्या सवयी, पुरेशी झोप, व्यायाम या सर्वाच्या अभावापायी येणाऱ्या पिढीवर त्याचे परिणाम हमखास होतील, वेगवान, स्पर्धा असणारी बदललेली जीवनशैली आणि त्या अनुषंगिक येणारे आजार हे आपणच आपल्याभोवती निर्माण केलेले चक्र आहे. आपण त्यात खुशीने शिरलो आहोत. कोठे थांबायचे, उद्याचे काय हे ओळखावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)