जिल्हा परिषदेच्या “त्या’ शिक्षकांच्या होणार बदल्या

सातारा – जिल्हा परिषद शाळांमधील संवर्ग एक ते चार मधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून गुरुवार, दि. 20 रोजी समुपदेशनाने बदल्या होणार आहेत. त्यामध्ये खोटी माहिती भरल्यामुळे कारवाई करण्यात आलेल्या 21 शिक्षकांचा समावेश असून त्यांना सोयीच्या मिळालेल्या शाळेवर पाणी सोडावे लागणार आहे. शिवाय, नोटीस बजावलेल्या 16 शिक्षकांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या गतवर्षी प्रथमच ऑनलाईन प्रक्रियेने बदली केल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 70 हुन अधिक शिक्षकांनी बोगस माहिती भरल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. बदलीसाठी अपंग असल्याचे प्रमाणपत्र जोडणे, पती- पत्नी यांच्या शाळेतील अंतर जास्त दाखवणे, पती अथवा पती नोकरीला असल्याचे प्रमाणपत्र देणे, मुलास दुर्धर आजार असल्याचे प्रमाणपत्र दाखल करणे अथवा बदली अधिकारप्राप्त नसताना ही तसे अर्जात नमूद करणे आदी. प्रकार शिक्षकांनी केले होते. त्यावर प्राप्त तक्रारीनुसार, सुमारे वर्षभर त्यांना नोटिसा देने, खुलासा घेणे असा खेळ सुरू होता.

अखेरीस चालू महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शासनाच्या आदेशानुसार दोषी आढळलेल्या 21 शिक्षकांनी एक वेतन वाढ रोखली. तसेच इतर 16 जणांना खुलासाबाबत नोटीस पाठविली. त्यामुळेच वर्षभर रखडलेली कारवाई पुढे सरकली. दरम्यान, बोगस माहिती भरून बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांची संबंधित शाळेवरून बदली करावी, असे आदेश ग्रामविका विभागाने पत्रकाद्वारे दिले होते. त्यामुळे आता या 21 शिक्षकांवर बदलीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्याचबरोबर 16 शिक्षकांना चौकशीला सामोरे जावे लागणार असून चौकशीनंतरच 16 शिक्षकांच्या बदलीचा निर्णय होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×