पुणे – पोस्टात पीपीएफ, सुकन्या समृद्धी आणि छोट्या बचत योजनांमध्ये पैसे डिपॉझिट करण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमानुसार खातेधारक नॉन होम पोस्ट ऑफिस ब्रॅंचमध्येही 25 हजारपेक्षा जास्त रक्कमेचा चेक जमा करू शकणार आहेत. त्यामुळे पोस्टाच्या गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला आहे.
“चाल आहे कासवाची, पण आहे भरवशाची’ अशी पोस्ट ऑफीसच्या कारभारावर टीका केली जायची. मात्र, आता बॅंकेतही आपली रक्कम सुरक्षित नसल्याची सर्वसामान्यांमध्ये धास्ती आहे. त्यामुळे बचत करण्यासाठी आता अनेकजण पोस्टाला प्राधान्य देऊ लागले आहेत. नागरिकांना पोस्टाच्या खात्याच्या नॉन होम पोस्ट ऑफिस ब्रॅंच म्हणजे गुंतवणुकदारांनी ज्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले त्याऐवजी दुसऱ्या पोस्ट कार्यालयातूनही संबंधित गुंतवणुकदाराच्या खात्यात रक्कम भरता येईल.
जुन्या नियमानुसार नॉन होम पोस्ट ऑफिस ब्रॅंचमध्ये 25 हजारापेक्षा जास्त रक्कमेचा चेक डिपॉझिट करण्याची परवानगी नव्हती. दोन डिसेंबर 2019 च्या आदेशानुसार, पोस्ट ऑफिस विभागाने आपल्या नियमात बदल केले आहेत. छोट्या बचत योजनांमध्ये 25 हजारापेक्षा जास्त रक्कम चेकने जमा करता येत नाही, अशा तक्रारी पोस्ट विभागाला प्राप्त होत्या. त्यामुळे पोस्ट विभागाने नियमांमध्ये बदल केले आहेत. त्याचा फायदा गुंतवणुकदारांना होणार आहे. आजही पोस्टातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित समजली जाते. पोस्टात छोट्या बचत योजनांवर मिळणारे व्याजही आकर्षक आहे.