पुणे – विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यात पुढच्या महिन्यात 21 तारखेला मतदान आणि 24ला मतमोजणी होणार आहे. त्या दिवशी होणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाकडून देण्यात आली.
राज्यातील विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यात होत आहे. त्याचे वेळापत्रकही नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार विद्यापीठाकडून मतदान व मतमोजणीच्या दिवशी होणाऱ्या परीक्षांची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावर मतदान व मतमोजणीच्या दिवशी होणारी परीक्षा ही सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घेण्यात येणार असल्याच्या विषयावर शिक्कामोर्तब झाले होते.
यासंदर्भात, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर निवडणुकांच्या तारखांमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलली जातील. त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक येत्या सात-आठ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकांदरम्यान होणाऱ्या परीक्षांविषयी विद्यार्थ्यांनी संभ्रम ठेवू नये. त्याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच माहिती प्रसिद्ध केले जातील, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.