शिवजयंती मिरवणुकीनिमित्त वाहतुकीत बदल

पुणे – शिवजयंतीनिमित्त मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे वाहतूक शाखेकडून गुरुवारी (12 मार्च) शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्‍त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर येथून दुपारी साडेचारच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात होणार असून, रामोशी गेट चौक, नेहरु रस्ता, ए. डी. कॅम्प चौक, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अरुणा चौक, अल्पना चित्रपटगृह, डुल्या मारुती चौक, हमजेखान चौक, सतरंजीवाला चौक, तांबोळी मशीद चौक, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके हौद चौक, जिजामाता चौक यामार्गे जाऊन लाल महाल येथे समारोप होणार आहे. त्यामुळे हे मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर मार्ग वाहनांसाठी खुला करून देण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. मिरवणुकीच्या मार्गावर दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.