पुणे – पुणे विभागातील उरूळी आणि यवत स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गावर सुरू असणाऱ्या दुरूस्तीच्या कारणास्तव दौंड मार्गे जाणाऱ्या गाड्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या मार्गावर दि. 13 रोजी रेल्वेकडून साडेतीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पुणे स्थानकाहून दौंडकडे 14.45 वाजता सुटणारी डेमू (71409) आणि दौंड स्थानकाहून 17.10 वाजता पुण्याकडे सुटणारी डेमू (71410) रद्द करण्यात आली आहे.
बारामती स्थानकाहून 14.25 वाजता पुण्याकडे सुटणारी बारामती-पुणे पॅसेंजर गाडी (51452) फक्त दौंड स्थानकापर्यंत धावणार आहे. दौंड ते पुणे स्थानकांदरम्यान गाडी धावणार नाही.
पुण्याहून 14.25 वाजता निजामाबादकडे जाणारी पुणे-निजामाबाद पॅसेंजर गाडी (51421) नियोजित वेळेनुसार दौंड स्थानकाहून सुटणार आहे. पुणे ते दौंड मार्गावर ही गाडी धावणार नसून, ही गाडी थेट दौंड ते निजामाबाद या मार्गावर धावणार आहे. दरम्यान, या मार्गावर धावणारी मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस (11301) पुणे विभागामध्ये सुमारे 2 तास 20 मिनिटांचे थांबे घेणार आहे. तर जम्मूतावी-पुणे झेलम एक्सप्रेस (11078) केडगाव स्थानकावर 30 मिनिटे थांबणार आहे.