पुणे – रेल्वेच्या सोलापूर विभागातील भळवणी ते भिगवण मार्गादरम्यानच्या तांत्रिक कामांमुळे या मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. यादरम्यान 7 एप्रिलपर्यंत पुणे-सोलापूर-पुणे गाडी रद्द केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील भळवणी ते भिगवण या मार्गावर दुहेरीकरणाचे काम सुरू असून, तांत्रिक कारणांमुळे ब्लॉक घेतला आहे. यामुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या आहेत; तर काही वळविण्यात आल्या आहेत
.
आठवड्यातून पाच दिवस धावणारी पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस 7 एप्रिलपर्यंत, 2 ते 8 एप्रिलदरम्यान पनवेल-नांदेड आणि 7 एप्रिलपर्यंत नांदेड-पनवेल एक्स्प्रेस रद्द केली आहे.
याशिवाय, 6 एप्रिलपर्यंत विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस आणि 8 एप्रिलपर्यंत एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द केली आहे. यासह सीएसएमटी-नागरकोईल एक्स्प्रेसच्या मार्गात बदल केला असून, ही गाडी कोकण रेल्वे-शोरानूर-इरोडमार्गे धावणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.