मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

पुणे – शिवाजीनगर येथील मेट्रोच्या कामानिमित्त शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल केले आहेत. या परिसरातील वाहतूक वळवण्यात येणार असून, पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्‍त डॉ. संजय शिंदे यांनी आदेश दिले आहेत.

शिवाजीनगर एसटी स्टॅन्ड तीन हत्ती चौकापासून न.ता.वाडीकडे जाण्यास आणि न.ता.वाडीकडून शिवाजीनगर एस.टी.स्टॅन्डकडे येण्यास तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंदी घालण्यात येणार आहे. शिमला ऑफिसकडून न.ता.वाडीकडे जाणाऱ्या पीएमपी बसेस आणि अन्य वाहनांनी शिमला ऑफीस चौकातून वीर चापेकर चौकातून उजवीकडे वळून सरळ के.एम.जोशी रस्त्यामार्गे न.ता.वाडी या मार्गाचा वापर करून इच्छित स्थळी जावे, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. शिवाजीनगर एस. टी. स्टॅन्ड ते न.ता.वाडी चौक, दळवी हॉस्पिटल ते देवी हाईटस, देवी हाईटस ते कृषी भवन, वीर चापेकर चौक ते न.ता.वाडी चौक या मार्गाच्या दोन्ही बाजूस नो-पार्किंग करण्यात येत आहे.

कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गतही बदल
कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गतदेखील 9 जूनपर्यंत रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. मंगलदास चौकाकडून आयबी चौकाकडे आणि मोबाज चौकातून ब्ल्यू डायमंड चौकाकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. या मार्गाऐवजी आरटीओ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी मंगलदास चौकातून डावीकडे वळून आयबी चौक, पुणे स्टेशनमार्गे इच्छितस्थळी जावे. तर मोबाज चौकाकडून येरवड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी मोबाज चौकातून उजवीकडे वळून ब्ल्यू डायमंड चौक, कोरेगाव पार्क चौक, महात्मा गांधी सेतूमार्गे डावीकडे वळावे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.