मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी कालावधीमध्ये शहरातील काही भागांतील वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोरेगाव पार्कमधील साऊथ मेन रोडवरील धान्य गोडावून परिसराचा समावेश आहे. या परिसरातील काही रस्ते दि. 23 रोजी सकाळी पाच वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत “नो व्हेईकल झोन’, वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. तर काहींवरील वाहतूक वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक उपायुक्‍त पंकज देशमुख यांनी दिली. फायरब्रिगेड, रुग्णवाहिका आणि पोलीस वाहने ही अत्यावश्‍यक वाहने वगळता अन्य वाहनांना हे नियम लागू असणार आहेत.

वाहतूक वळविण्यात आलेले मार्ग
1. सेंट मिरा कॉलेज आणि अतुर पार्क सोसायटीकडून साऊथ मेन रोडकडे येणाऱ्या वाहनांना लेन क्र.1 पर्यंत प्रवेश देण्यात येईल. लेन क्र. 1 येथे डावीकडे वळून जावे लागणार आहे.
2. साऊथ मेन रोडवर लेन क्र. 5, 6 आणि 7 कडून साऊथ मेन रोडवर येणाऱ्या वाहनांना लेन क्र. 4 पर्यंतच प्रवेश देण्यात येईल. लेन क्र. 4 येथे उजवीकडे वळून जावे लागणार आहे.
3. सेंट मिरा कॉलेज आणि कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनसमोर तसेच साऊथ मेन रोड लेन क्र. 5 येथे आवश्‍यकतेप्रमाणे बॅरिकेटींग करण्यात येईल.
4. साऊथ मेन रोड लेन क्र. 2 येथील प्लॉट क्र. 38 – जैन प्रॉपर्टीसमोर बॅरिकेटींग करून सर्व वाहनांना साऊथ मेन रोडकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
5. साऊथ मेन रोड लेन क्र. 3 येथील बंगला क्र. 67 आणि 68 दरम्यान बॅरिकेटींग करून सर्व वाहनांना साऊथ मेन रोडकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
6. दरोडे पथ (कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन) ते लेन क्र. 5 साऊथ मेन रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूस दि. 22 मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते दि. 23 मे रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत “नो व्हेईकल झोन’ करण्यात येणार आहे.

…या ठिकाणी पार्किंग व्यवस्था
मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मतमोजणी करता येणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि अन्य नागरिकांनी दुचाकी वाहनांचे पार्किंग संत गाडगे महाराज शाळेच्या आवारात आणि चारचाकी पार्किंग रोहिव्हीला गार्डन लेन क्र. 7 आणि नॉर्थ मेन रोड येथील लेन क्र. 1 जवळील माचवे अंध शाळा येथील दोन मैदानांवर करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.