विश्रांतवाडीच्या पालखी विसाव्यात बदल

पुणे – संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा विश्रांतवाडी (फुलेनगर) येथील विसाव्यात बदल करण्यात आला आहे. यंदापासून हा विसावा, फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयाबाजूला असेल. पूर्वी हा विसावा आरटीओसमोरील दत्त मंदिरात होता.

विश्रांतवाडी ते येरवडापर्यंत बीआरटी मार्ग आहे. या मार्गातून पालखी सरळ आल्यानंतर पुन्हा प्रचंड गर्दीत दत्तमंदिरात पालखीचा भोजनासाठी दुपारचा विसावा असतो. मात्र, पालखी विश्रांतवाडी बीआरटी मार्गातून या विसाव्याच्या ठिकाणी आल्यानंतर दत्त मंदिरात जाण्यासाठी बैलजोडीसह पालखी रथ मंदिराच्या दिशेने वळविण्यात मोठा वेळ जातो. त्यामुळे महापालिकेने विसाव्यासाठी बीआरटी मार्गातच सुविधा करून द्यावी, अशी मागणी संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळा संयोजकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार, मागील आठवड्यापासून त्यावर चर्चा सुरू होती. अखेर हे विसाव्याचे ठिकाण बदलण्यास महापालिकेनेही तयारी दर्शविली असून दत्त मंदिरासमोरील आरटीओ कार्यालयालगतच्या जागेत बीआरटी मार्गातच हा विसावा निश्‍चित करण्यात आला आहे. त्यासाठी मांडव तसेच दर्शनबारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी बुधवारी पुणे मुक्कामी येणार असून दुपारचा विसावा या बदललेल्या ठिकाणी असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.