Pune | शिवभोजन बिलाच्या कार्यपद्धतीत बदल

पुणे, – काही शिवभोजन केंद्रचालक एकाचे व्यक्तीचे छायाचित्र दोनदा अपलोड करून बिले लाटत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आता केंद्रचालकांची बिले देण्याच्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यानुसार बिलांसोबत प्रत्येक थाळी वितरणाचे विवरणपत्र केंद्रचालकांना द्यावे लागणार आहे, तसेच सीसीटीव्ही उपलब्ध असल्याचे दुबार फोटो व दुबार छायाचित्र अपलोड केले नसल्याचे स्वंयघोषणापत्र द्यावे लागणार आहे. यासह लाभार्थ्यांचा फोटो काढताना पाठीमागील बॅनरवर दिनांक नमूद करण्यात यावा, असेही शासनाने आदेशात म्हटले आहे.
शिवभोजन योजनेतील केंद्र चालकांना शिवभोजन योजनेच्या देयके (बिले) देण्यास विलंब होत आहे. काही केंद्र चालकांकडून विहित वेळेत बिले सादर करण्यास विलंब होत आहे. राज्य शासनाकडे त्याअनुषंगाने अनेक तक्रारी येत आहेत. आता या केंद्र चालकांची बिले वेगाने वितरीत करण्यासाठी कार्यप्रणाली आखण्यात येत असून, त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
याशिवाय अटी, शर्तीदेखील निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्र योजनेतील केंद्रचालकांना राज्य शासनाला पुन्हा बिले पाठवावी लागणार आहेत. प्रत्येक शिवभोजन केंद्र चालकांनी दरमहा १५ दिवसांच्या कालावधीत संबंधित उपनियंत्रक शिधावाटप तहसीलदार कार्यालयास देयके (बिले) सादर करावीत. असे आदेश शासनाने दिले आहेत.





