सातारा जिल्ह्यात परिवर्तन अटळ : नरेंद्र पाटील

कराड – मला राजकीय परंपरा नाही. मात्र, चळवळीची मोठी परंपरा आहे. स्व. आण्णासाहेब पाटील आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या संदर्भाने उध्दव ठाकरे यांनी माझ्यावर विश्‍वास टाकला. भाजपकडून मला मागून घेऊन शिवसेनेची उमेदवारी दिली. आम्ही सर्व घटक एक आहोत. त्यामुळे जिल्ह्यात परिवर्तन अटळ आहे. गेल्या दहा वर्षांत सातारा जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. ती मोडून काढून जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी जिल्ह्यातील मतदार मला निवडून देतील, असा विश्‍वास सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप आणि मित्र पक्ष युतीचे उमेदवार, आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्‍त केला.

येथील हॉटेल अलंकारमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख ना. नितीन बानुगडे-पाटील, पुरूषोत्तम जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे आदींसह सेना-भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

नरेंद्र पाटील म्हणाले, सातारचा खासदार झालो, तर प्रलंबित वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न मार्गी लावणार आहे. पर्यटनातून उद्योग निर्मिती, अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करणे यासह महिलांच्या सबलीकरणासाठीही आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगून नरेंद्र पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात शेकडो कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. भविष्यातही अशीच कामे होत राहतील. माथाडी कामगार संघटना आपल्या पाठीशी असून आपल्यातील एक माणूस लोकसभेत जाउन प्रलंबीत प्रश्‍न सोडवताना त्यांना पहायचा आहे. पूर्वी जसे सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे यांना माथाडींनी एकजूट दाखवून निवडून आणले होते. तेच माथाडी कामगार मलाही निवडून आणतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामापासून आपण खूपच प्रभावीत झालो असून त्यांनी नेहमीच माथाडींच्या प्रश्‍नांबाबत सकारात्मकता दाखवली आहे. याउलट परिस्थिती जिल्ह्याचे सुपूत्र मुख्यमंत्री असताना होती. मी राष्ट्रवादी असताना तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी माथाडींच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले आणि राष्ट्रवादीचा आमदार म्हणून आपणासही दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केला.

आपले कॉंग्रेससह राष्ट्रवादीत अनेक मित्र असून त्यांच्याकडून आपल्याला निश्‍चितपणे मदत मिळेल, असे सांगून नरेंद्र पाटील म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांच्यासाठी मी सभा घेतल्या होत्या, त्यांची मदत मतपेटीतून कळेल. ते त्यांच्या पध्दतीने आम्हाला मदत करतील. मला परमनंट राहून लोकांचे काम करायचे आहे. स्टाईलपेक्षा विकास महत्वाचा आहे. त्यालाच आमचे प्राधान्य राहील. भाजपकडून शिवसेनेने मला ओट्यात घेतले, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. मात्र, ते फार मोठे नेते आहेत. मी त्यांच्या टीकेला नक्‍कीच उत्तर देईन. उध्दव ठाकरे यांनी माझी उमेदवारी मागून घेतली आणि मुख्यमंत्र्यांनीही त्याला संमती दिली. यावरून युती किती घट्ट आहे, याचे दर्शन घडले, हे टीका करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे, असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले.

ना. बानुगडे-पाटील म्हणाले, देशाला स्थिर सरकार देणे ही आमची प्राथमिकता आहे. राष्ट्रहिताच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. इंदिरा गांधींनी सत्तरच्या दशकात गरीबी हटावचा नारा दिला होता. आता पुन्हा कॉंग्रेस अध्यक्षांनी गरीबी हटावचा नारा दिला आहे. म्हणजे मधल्या काळात गरीबी हटली नाही, याचा पुरावाच कॉंग्रेसने दिला आहे. गरीबी आणि जातीयवाद तसाच राहिला पाहिजे, असा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न राहिला आहे. केंद्रात नरेंद्र हवे असतील, तर जिल्ह्यातसुध्दा नरेंद्रच हवेत. म्हणूनच जनतेने राष्ट्राचा, विकासाचा विचार करून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.