पुणे – “नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ची (एनजीएमए) वास्तू कलाकारांसाठी वंदनीय आहे. या वास्तूमधील पाच मजल्यांपैकी चार मजले हे एनजीएमएची प्रदर्शने आणि एका मजल्यावर अन्य चित्रकारांची प्रदर्शने असतील, हा निर्णय आमच्यासाठी मोठा धक्का आहे. यांसह ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्यासारख्या कलाकाराला त्यांच्या कारकिर्दीसाठी मानवंदना देणारे प्रदर्शन रद्द करणे ही जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी माझे मत व्यक्त केले तर औचित्यभंग कसा होतो, असा सवाल ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई येथील “नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना पालेकर यांचे भाषण थांबविण्यात आहे. त्यासंदर्भात अमोल पालेकर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
बर्वे यांचे निधन होऊन 24 वर्षे झाली. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ चित्रकाराची आठवण काढायाला आम्हाला 24 वर्षे जावी लागतात, ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. बर्वे यांना अभिवादन करणारे हे शेवटचे प्रदर्शन असल्याचे माझी माहिती होते. त्याचबरोबर यानंतर कलाकारांची सल्लागार समिती नसेल, त्यानुसार आता सगळे निर्णय दिल्लीतून घेतले जाणार का?, असा सवाल पालेकर यांनी केला.
एनजीएमएच्या संचालकांनी मला सांगितल्याप्रमाणे हे शासकीय कलादालन असल्याने, ते आपण कररूपी दिलेल्या पैशांतूनच चालते. तर त्याबद्दल घेतलेल्या निर्णयांबद्दल या व्यासपीठावर आवाज उठविण्यात गैर काय ? तसेच आम्ही मनात आलेले प्रश्न कोठे मांडायचे? असाही प्रश्न पालेकरांनी उपस्थित केला.
यापुढेही बोलत राहीन
मी अनेक वर्षे सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत आहे, यापुढेही बोलत राहीन. सेन्सॉरशिप हा अराजकीय मुद्दा असला तरी आजही तो मोठ्या प्रमाणावर जाणवतो, असे म्हणताना पालेकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाचा संदर्भ दिला. यावेळी ते म्हणाले, “नयनतारा सहगल यांचा मुखवटा घालून निमूटपणे बसलेल्या तीन महिलांना बाहेर काढण्यात आले आणि या प्रकाराबद्दल व्यासपीठावर कोणीही का बोलले नाही?’
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा