मराठा आरक्षण लागू होणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलचा निर्णय
पुणे – वैद्यकीय आणि दंतवैद्यकच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) नव्याने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्याप्रमाणे प्रवेशाची गुणवत्ता यादी येत्या बुधवारी (दि. 15) सायंकाळी 7 वाजता जाहीर करण्यात येणार सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत इतर मागास प्रवर्गापेक्षा “एसईबीसी’ प्रवर्गासाठी अधिक जागा देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत अनेक अभ्यासक्रमांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी जागा शिल्लक नव्हती. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया 2 नोव्हेंबर सुरूवात झाली. त्यानंतर 30 नोव्हेंबरला मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण लागू करणारा “एसईबीसी’ कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे 2019 च्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होऊ शकत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आला.
त्यानंतर उच्च न्यायालयाने 2 मे रोजी याप्रकरणी राबवलेली सर्व प्रवेश प्रक्रिया रद्द केली आणि नव्याने आरक्षण निश्चित करून प्रवेश करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाला राज्य सरकारने आव्हान दिले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. मुकेशकुमार शहा यांच्या पीठाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. या सर्व पार्श्वभूमीवर सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेचे नवे वेळापत्रक जाहीर केले. त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार प्रवेशाची गुणवत्ता यादी येत्या बुधवारी जाहीर होईल.
यादीतील विद्यार्थ्यांना 14 ते 16 मे दरम्यान संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, असे सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची कटऑफ तारीख 25 मे असून, त्याच दिवशी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सीईटी सेलसोबत इतर सरकारी यंत्रणांना पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना अधिक माहिती https://info.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे राज्य सीईटी सेलकडून कळविण्यात आले.