पुणे -देशातील आयआयटी, एनआयटी आणि नामवंत अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर जेईई मेन परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी गुरुवारी ट्विटद्वारे दिली.
जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यातील तारखा त्याच राहणार आहेत. म्हणजेच, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 20 ते 25 जुलै यादरम्यानच होणार आहेत. मात्र, चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
आता जेईई मेन परीक्षेच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 1 आणि 2 सप्टेंबर या दिवशी घेण्यात येणार आहे. एकूण 7 लाख 32 हजार परीक्षार्थींनी जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी केली आहे, अशी माहितीदेखील धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.
यापूर्वी चौथ्या टप्प्यातील परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट यादरम्यान होणार होत्या. आता
या परीक्षा सुधारित तारखांनुसार होतील. दरम्यान, जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. पण आता परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्यामुळे नोंदणीची मुदतदेखील 20 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद म्हटले आहे.