ग्राहकांच्या वर्तणुकीत बदल

झटपट खरेदी करून पटकन निघून जातात 

मुंबई – करोना संसर्गाच्या भीतीमुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम होत आहे. या काळात ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या पद्धतीत बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. अगोदर ग्राहक दुकानात गेल्यानंतर किंमत, उत्पादनाची वैविध्यता इत्यादीकडे लक्ष देण्यासाठी वेळ खर्च करीत होते. मात्र, आता या सर्वांकडे दुर्लक्ष करून शक्‍य तितक्‍या लवकर खरेदी करून बाहेर पडण्याची प्रवृत्ती ग्राहकांमध्ये वाढली आहे. 

यासंदर्भात रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण केले. ग्राहकाकडून मनोरंजन, प्रत्यक्ष खरेदी, बाहेरचे खाणे कमी झाले आहे. मात्र, आता करोनावरील लस दृष्टिपथात असल्यामुळे उत्सवाच्या काळात जर परिस्थिती सुधारली तर आतापर्यंत तुंबून राहिलेली मागणी वेगात वाढण्याची शक्‍यता आहे. ग्राहक मोठ्या मॉलमध्ये जाण्याचे टाळतात. जरी आले तरी पटकन वस्तू घेऊन निघून जातात. एखादी वस्तू निश्‍चितपणे खरेदी करायची ठरविली असेल तर मॉलऐवजी ई-कॉमर्सचा वापर केला जातो, असे असोसिएशनचे अध्यक्ष कुमार राजगोपालन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अगोदर खरेदी कुटुंबातील अनेक सदस्य जाऊन करीत असत. आता शक्‍यतो कुटुंबातील फक्त एखादा सदस्य जाऊन खरेदी करत असल्याचे दिसून येते.

दालनातील कामाच्या पद्धतीत बदल
ग्राहकांना सुरक्षितता अधिक महत्त्वाची वाटते. याची माहिती दुकानदारांना झाली असून दुकानदार आपले दालन जास्तीत जास्त स्वच्छ राहील, त्याचे निर्जंतुकीकरण केले असेल याची काळजी घेऊ लागले आहेत. त्याचबरोबर जो दुकानदार सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेची जास्त काळजी घेतो त्याकडे ग्राहक आकर्षित होऊ लागले आहेत. जोपर्यंत लस निघत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने काम करावे लागेल,  असे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कुमार राजगोपालन यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.