शिक्रापूर -एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा व पेरणे फाटा येथे होणाऱ्या विजय रणस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे- नगर रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक वेगळ्या मार्गाने वळविण्यात येणार असल्यामुळे पुणे- नगर महामार्गावरील वाहतूक मंगळवारी (दि. 31) रात्री अकराच्या दरम्यान वेगळ्या मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीत बदल होणार आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे एक जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीमुळे दोन वर्षांपासून प्रशासन विशेष दखल घेत आहे. यावेळी देखील अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. पेरणे फाटा, कोरेगाव भीमा परिसरात येणाऱ्या समाज बांधवांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परिसरातील काही किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली आहे. एक जानेवारी रोजी अहमदनगर बाजूने पुण्याच्या दिशेने येणारी सर्व वाहने शिक्रापूर चौकातून चाकणमार्गे, पुणे बाजूने अहमदनगरकडे जाणारी वाहने येरवडा, आळंदीमार्गे चाकण, शिक्रापूर दिशेने तसेच खराडीमार्गे हडपसर, केडगाव चौफुलामार्गे शिरूरच्या दिशेने, नगर बाजूने हडपसरच्या दिशेने येणारी सर्व जड वाहने न्हावरा फाटा तसेच केडगावमार्गे वळविण्यात येणार आहेत.
आळंदी बाजूने अहमदनगरकडे जाणारी वाहतूक मरकळ, शेलपिंपळगावमार्गे शिक्रापूर बाजूने वळविण्यात येणार आहे. पेरणे फाटा व कोरेगाव भीमा येथे अभिवादनासाठी येणाऱ्या बांधवांसाठी कोरेगाव भीमा, पेरणे फाटा येथून काही अंतरावर ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून स्वतंत्र बसची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे- नगर रस्त्यावरील गावांमध्ये येणाऱ्या समाजबांधवांचे ग्रामस्थांच्या वतीने विशेष स्वागत यावेळी करण्यात येणार आहे. एक जानेवारी रोजी नागरिकांनी देखील वाहनांचा वापर न करणे सोयीस्कर राहणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.