बारामतीतील ठोकताळेच बदलले

भाजपचे बारामती मतदार संघाचे सहप्रभारी गणेश बिडकर यांचा दावा

पुणे – बारामती लोकसभा निवडणुकीकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारा विरोधात महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांचे नाव जाहीर झाल्यानंतर या मतदार संघातील निवडणुकीचे ठोकताळेच बदलले आहेत. युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या माध्यमातून बारामतीत वेगळा इतिहास लिहला जाणार असून महायुती खरोखरच इतिहास घडवणार आहे, असा विश्‍वास भाजपचे बारामती मतदार संघाचे सहप्रभारी गणेश बिडकर यांनी व्यक्त केला.

बारामतीच्या रिंगणात भाजप महायुतीने तगडा उमेदवार उतविल्याने या मतदासंघात विरोधकांची पिछेहाट झाली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बिडकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, अल्पावधीत भाजप महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी मतदार संघाचा दौरा करीत तळागळापर्यंत संपर्क साधला आहे. नागरिकांकडून त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद आताच निवडणुकीचा निकाल स्पष्ट करीत असल्याचा विश्‍वासही बिडकर यांनी व्यक्त केला.

बारामती शहराबरोबरच इंदापूर, दौंड, पुरंदर, सासवड, भोर, वेल्हा, हवेली, खडकवासला, मुळशी, हिंजवडी आणि पुणे शहर व उपनगरातील सर्व भागांमध्ये उमेदवार कुल यांच्यासह युतीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गाव ते गावच्या या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रचार यंत्रणा राबवित आहेत.

भाजपकडून बुथ प्रमुख आणि शक्तीप्रमुख यांच्याकडून घरोघरी जाऊन प्रचार ही उमेदवार कुल यांच्या प्रचाराचे वैशिष्ठ्य मानले जाते. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अकलूज येथे संयुक्त प्रचार सभा होत आहे. यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन झंझावाती सभा कालाटणी देणारी ठरणार आहे. तसेच, अमित शहा दि. 19 तारखेला बारामतीत सभा घेऊन संपूर्ण शहर ढवळून काढणार आहेत. याच मतदार संघाकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खडकवासला मतदारसंघात सभा घेत असल्याने बारामती मतदासंघातून कांचन कुल यांना आघाडी मिळेल, असा ठाम विश्‍वास वाटत असल्याचे बिडकर यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.