ठाकरे सरकारच्या मंत्री मंडळातील खातेवाटपात बदल

मुंबई: राज्यात मोठ्या राजकीय नाट्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर शपथविधी झाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अन्य सहा मंत्र्यांना शपथ देण्यात आली. परंतु शपथ विधीनंतर तब्बल १५ दिवसानंतर या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. आता या खातेवाटपात ४८ तासांमध्येच बदल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांसह शपथ घेतलेल्या मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात ५४ खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास ही दोन महत्वाची खाती असून मंत्रिमंडळ विस्तारात गृह खाते राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील व छगुन भुजबळ यांच्या खात्यांची अदलाबदली करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे कोणतेही खाते ठेवलेले नसले तरी कोणत्याही मंत्र्यांकडे न देण्यात आलेली सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय ही खाती ठाकरे यांच्याकडे असणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेअंती खाते वाटपावर सहमती झाली. त्यानुसार छगन भुजबळ यांच्याकडे पाच आणि जयंत पाटील यांच्याकडे ९ खात्यांचा पदभार देण्यात आला होता, त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला असून, या बदलास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मंजुरी दिली आहे.

पूर्वीचे खातेवाटप

छगन भुजबळ : ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
जयंत पाटील : वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

खातेवाटपातील बदल –

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांच्याकडे तर अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे. हा एकमेव बदल खातेवाटपात करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.