अबाऊट टर्न: बदल

हिमांशू

आमचा गणित हा विषय कच्चा होता; पण भाषाविषय चांगले होते. गणितात आम्ही कधी नापास झालो नाही; पण भरभरून गुणही मिळवले नाहीत. परिसर आणि परिस्थितीचे भान इतर मुलांप्रमाणेच आमच्यात हळूहळू येत राहिले. चारचौघांसारखेच ग्रॅज्युएट होऊन आम्ही बाहेर पडलो आणि चारचौघांसारखेच काही काळ बेरोजगारही होतो. भाषाविषयात असलेली गोडी आणि गती यातून अखेर मार्ग दिसला आणि आम्ही मार्गी लागलो. तात्पर्य, गणितात “ढ’ असल्याचा तोटा आम्हाला अद्याप फारसा जाणवला नाही. बऱ्याच जणांचा एखादा तरी विषय कच्चा असतोच; पण मार्गही निघतोच! असो, परिस्थिती बदलत असते आणि गरजा, अपेक्षाही बदलत असतात.

बदल हाच स्थायीभाव. परंतु कालपर्यंत दोनावर दोन बावीस म्हणत होतो आणि उद्यापासून दोनावर दोन “वीस दोन’ असं म्हणायचं, हा बदल काही अजून झेपलेला नाही. मुळात याला “बदल’ म्हणावं का, हाच प्रश्‍न आम्हाला पडलाय. या बदलाची दोन कारणे दिली गेलीत. एक म्हणजे, इंग्रजीप्रमाणे अंक मोजणे सोपे जाते आणि दुसरा म्हणजे लहान मुलांना जोडाक्षरे म्हणणे कठीण जाते. मराठी आणि गणित या दोन्ही विषयांमधल्या ज्ञानाला ताण देऊन आम्ही एक ते शंभर अंक म्हणून पाहिले. प्रत्येक दहा अंकांमागे फारतर तीन-चार जोडाक्षरे येतात. त्यातली बरीचशी (उदा. “त्त’) लहान मुलांना म्हणता येण्याजोगी असतात.

परंतु कोणताही दावा न करता, याहून अधिक जोडाक्षरे येतही असतील आणि ती उच्चारण्यास सोपी नसतील, असे गृहीत धरूया. मुख्य प्रश्‍न असा की, उद्या कुणी आम्हाला एखाद्या वस्तूची किंमत “नव्वद सात रुपये’ सांगितली तर आम्हाला पटकन कळणार नाही, हे वास्तव! सबब, हा बदल व्यवहारात कसा आणणार, असा एक प्रश्‍न आम्हाला पडला, एवढंच! अन्य भारतीय भाषांमध्येही इंग्रजीप्रमाणेच मोजदाद केली जाते, असंही कारण सांगितलं गेलंय. पण अनेक भारतीय भाषांमध्ये मराठीपेक्षा जास्त जोडाक्षरे आहेत, हे मात्र कुणी सांगितले नाही. उदाहरणार्थ, कन्नडमधील अंक म्हणताना आमच्या जिभेला गाठ बसली होती. पण त्या-त्या भाषेत शिकणारी पोरं छान उच्चार करतात.

मूलभूत मुद्दा असा की, गणित महत्त्वाचे आणि भाषा त्या मानाने दुय्यम, असा याचा अर्थ होत नाही का? मुख्य म्हणजे, मराठीला अभिजात भाषा हा दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करणार आणि दुसरीकडे “जमत नाही’ म्हणून भाषेचे वळणच बदलून टाकणार, यात कुणाला विरोधाभास कसा दिसत नाही? आजकालची मुले अधिक गुण मिळवणारी, हे खरं; परंतु पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, मिळवण्या तोंडपाठ असलेली मुले महाराष्ट्रात होतीच की!

अर्थात, प्रत्येक काळात मुले “ठेविले अनंते…’ म्हणतच शिक्षण घेत आली आहेत. आणखीही अनेक बदल मुले स्वीकारतील; पचवतील. परंतु “छप्पन्न’ असा अंक शिकलेल्या व्यक्‍तीसमोर व्यवहारात अचानक जेव्हा “पन्नास सहा’ असा शब्द येईल, तेव्हा काय घडेल? “चांगली मराठी शिकायची असेल, तर आधी चांगली इंग्रजी शिकली पाहिजे,’ असे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलले गेलेच आहे. शिवाय, अन्य भाषांच्या आक्रमणामुळे मराठीची धूप सुरू आहेच. त्यात हा स्वेच्छेचा लोटांगणवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)