सोच को बदलो

हॅलो सर, येता ना या वर्षीही, मुलांना भेटायला” “”कोण बोलताय?” “”सर मी राजाराम मोरे बोलतोय. अहो, परीक्षा जवळ आली आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा आठवड्यावर येऊन ठेपली आहे. तुम्ही आलात ना की मुलांना आनंद होतो. मुलांना शुभेच्छा द्यायच्या आहेत.”

मोरे गुणी मुलांविषयी भरभरून बोलत होते. सर गेल्यावर्षी पहिल्यांदा या शाळेत गेले होते. आजवर मुलांना भेटून, व्याख्यानातून त्यांनी मुलांचा आत्मविश्‍वास वाढवला होता. मागील वर्षीच्या मार्गदर्शनाची आठवण त्यांना झाली. तीन मजली इमारत, या शाळेतील सर्व मुले शाळेत आणि वसतिगृहात तिथेच राहतात. सकाळचे नऊ वाजले होते. सर शाळेत पोहोचले. समोर दहावी व बारावीची मिळून शंभरएक मुले असतील. काही पालकही आले होते. कारण हा शुभेच्छा समारंभ होता. शाळेतील सर्व शिक्षकही समोर होते.

मुलांना पाहून अतिशय आनंद झाला. मुले रांगेत समोर बसली होती. अतिशय निरागस चेहरा, मन शुद्ध, निर्मळ अशी ही मुले-मुली आपल्या आवडीचा ड्रेस घालून आली होती. परीक्षेचा ताण चेहऱ्यावर थोडाफार होता. पण सरांना तिथे गेल्यावर कळाले आजचे भाषण काही इतर मुलांसारखे नाही. आता कसे बोलायचे या विचारात सर असतानाच मुख्याध्यापकांनी सांगितले सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बोलत जा, मुलांना समजेल. कारण स्टेजच्या एका बाजूला माईक होता व दुसऱ्या बाजूला एक सर उभे होते. इकडून कार्यक्रमाला सुरुवात झाली. निवेदकाने कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे सुरुवात केली.

प्रास्ताविकात पाहुण्यांचा परिचय आणि सत्कार समारंभ आटोपला. माईकवरून आवाज लाऊड स्पीकरला जात होता. मुले सोडून पालक आणि शिक्षकच हे ऐकू शकत होते. परंतु मुलांना मात्र त्यांचे शिक्षक दुसऱ्या बाजूने त्यांच्या सांकेतिक खुणा करून मुलांना सांगत होते. सरांना प्रश्‍न पडला, नेमकी मार्गदर्शनाला सुरुवात कशी करायची आणि आज त्यांना नेहमीप्रमाणे बोलता येणार नव्हते. एकेक मुद्दा हळूहळू मांडावा लागणार होता. मुलांना देवाने सर्व काही दिले होते. आत्मविश्‍वास होता. सर्वांना पाहता येत होते. पण त्यांच्या आयुष्यात आवाज नव्हता. त्यांनी ना अंगाई ऐकली, ना घंटेचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, संगीत, गाणी, वारा, पाणी यांचा आवाज, गुणगुणले नाही की गाणी म्हणणे नाही, सर्व काही होते ते फक्‍त खुणांचा संवाद होता.

सरांनी विनोद केला, भाषणातील मुद्दे मुलांना पटले की मुले आनंदीत व्हायची, चेहऱ्यावर हास्य दिसायचे व हसायचाही आवाज नव्हता. टाळी वाजवणे तर नव्हतेच कारण त्यांनी कधी टाळी वाजवली नाही व टाळी ऐकली पण नाही. पण ब्रह्मानंदाची टाळी त्यांची लागली होती. नाहीतर इतर कार्यक्रमात लोक तीन प्रकारे टाळ्या वाजवतात. एक आवडले म्हणून, दुसरी आता बस्स झाले म्हणून आणि तिसरी भाषण थांबवावे म्हणून असते. स्व. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, “टाळी अशी पडावी जशी प्राजक्तांची फुले पडावीत.’

मुलांच्या चेहऱ्यावर भाव, अतिशय सुंदर देखणे चेहरे पाहून सरांना समाधान वाटत होते. मुलांना भाषणातील गोष्टी समजल्या की मुले हात वर करायची व नुसतीच हलवायची. तीच बहुतेक त्यांची टाळी असावी. आनंद झाला की छान छान म्हणताना आपण कशा खुणा करतो तशी मुले हाताचे पहिले बोट व अंगठा एकाला एक लावून सुंदर अशी खूण करायचे. एक वेगळा संवाद आणि भाषण सर अनुभवत होते. त्यावेळी त्यांना इतरही मुले आठवत होती. या मुलांकडे पाहून एक वेगळीच ऊर्जा उपस्थितांपैकी प्रत्येकाला होती.

आयुष्यात एक वेगळी शांतता होती. परंतु मनात चैतन्य हाते ते मुलांच्या वागण्या-बोलण्यात दिसत होते. आपला आवाज काढता येत नाही की ऐकता येत नाही याचे निमिषमात्रही दु:ख कुठे दिसत नव्हते. शाळा सुरू झाल्यापासून शाळेच्या दहावी आणि बारावी वर्गाचा निकाल दरवर्षी शंभर टक्‍के लागला होता.

सरांचे भाषण संपले, निवेदकांनी मुलांना प्रतिक्रिया द्यायला सांगितले. दहावीचा प्रतीक याने मी कसा अभ्यास करतो ते सांगितले व किती गुण मिळविणार याबद्दल मनोगत व्यक्‍त केले, तर बारावीचा अशोक शास्त्र शाखेत शिक्षण घेत होता. अशोक दहावीत पंच्याऐंशी टक्‍के मिळवून पास झाला होता व तेवढेच नव्हे तर त्याहीपेक्षा जास्त गुण मिळवून बारावी उत्तीर्ण होण्याचा त्याचा मानस होता. त्याने त्याचे मनोगतातून त्यांच्या संवाद शैलीतून ते व्यक्त केले होते. पुढील करिअरविषयी बोलताना आकाश म्हणाला, मला चांगले गुण मिळवून सीओईपीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे व संगणक इंजिनिअर झाल्यावर नवनवीन ऍप्लिकेशन मी तयार करणार आहे. त्यातील एक ऍप माझ्यासारख्या मुलांच्या अभ्यासासाठी असेल. त्यांना स्वत:चा अभ्यास स्वत:च करता येईल. स्वत:बद्दलचा आत्मविश्‍वास त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
मुलांच्या प्रातिनिधिक भाषणानंतर आभाराचे भाषण झाले, सर्व मनोगतांचे संवाद मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम कुंभार सरांनी केले होते. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला होता. सर्व उपस्थितांना मुलांकडूनच खूप काही शिकायला मिळाले होते. आभार मानताना व मुलांच्या आत्मविश्‍वासाबद्दल बोलताना निवेदकाने सांगितले.
सोच को तो बदलो, सितारे बदल जायेंगे,
नजर को तो बदलो, नजारे बदल जायेंगे,
कश्‍तिया बदलने की जरूरत नही,
अपनी दिशा को तो बदलो,
किनारे खुद ब खुद बदल जायेंगे
या सकारात्मक विचारासह कार्यक्रमातून प्रत्येकजण नवीन दिशा घेऊन जात होता.

अनिल गुंजाळ

You might also like
3 Comments
  1. प्रा. डॉ. सचिन देशमुख says

    अप्रतिम लेख आहे त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी कशी असावी या लेखातून पुढे येते. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा पॉजिटिव घेतला त्रास कमी होतो.

  2. स्वराली जितेंद्र लिंबकर says

    वा सर,,,वाचतानाच इतकं छान वाटतंय,उत्सुकता आहे ऐकण्याची.काय अनुभूती असेल ती,,,इथूनच कल्पना करते.खुणांचा संवाद आगळावेगळा अनुभव

  3. Haridas dhagate says

    अप्रतिम सर , really motivational.आपल्यामधे असना ऱ्या दोषयाव रड न्ययापेकशा we should think positive

Leave A Reply

Your email address will not be published.