घरे वाचविण्यासाठी आमदारांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील उच्च क्षमता द्रुतगती मार्गाची (एचसीएमटीआर) आखणी करताना थोडाफार बदल केल्यास बाधित होणाऱ्या थेरगाव, वाल्हेकरवाडी भागातील नागरिकांची घरे वाचतील. या दृष्टीने थेरगाजवळ बी.आर.टी.चा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. तर, वाल्हेकरवाडीजवळ स्पाईन रस्ता उपलब्ध आहे. त्याप्रमाणे रस्त्याची आखणी करण्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आज पत्राद्वारे सूचना केली. तसेच, त्याबाबतचा कच्चा आराखडा देखील दिला.
महापालिका हद्दीत एचसीएमटीआर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 30 किमी लांबीचा आणि 30 मीटर रुंदीचा “एचसीएमटीआर’ मार्ग रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरवमधील भागातून जातो. या भागातील नागरिकांची घरे या मार्गामुळे बाधित होणार आहेत.
कोणीही बेघर होऊ नये, यासाठी एचसीएमटीआरची आखणी ही नजीकच्या बी.आर.टी.एस. रस्ता व विकास आराखड्यातील 24 मीटर रुंदीच्या रस्त्याने वळविल्यास घरे वाचविता येतील. आखणीत बदल केल्याने एकही घर पाडले जाणार नाही. तसेच स्पाईन रस्त्यावरील जॅग्वार कंपनी कॉर्नर ते नाशिक फाट्याकडे येण्याऐवजी स्पाईन रस्ता-इंद्रायणी नगर-टेल्को रस्ता-लांडेवाडीपर्यंत आखणी केल्यास नागरिकांना लाभ होईल. त्या दृष्टीने आराखडा दोन तीन दिवसांत तयार करण्याची मागणी आमदार जगतापांनी केली आहे.
बाधितांना दिलासा मिळणार का?
या मार्गामुळे हजारो नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येणार असल्याचे सांगितले जात होते. घरे वाचविण्यासाठी सुमारे एक हजार दिवसांपासून बाधित आंदोलन करत आहेत. जर आराखड्यात बदल झाल्यास हजारो नागरिकांना दिलासा मिळू शकेल, यासाठीर आराखड्यात बदल करण्याची मागणी सुरुवातीपासून स्थानीय नागरिक करत आहेत. उशिरा का होईना, परंतु अशा प्रकारच्या सूचना आमदारांकडून आल्यामुळे बाधितांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.