पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेचा प्रशासकीय कारभाराचा कोलमडलेला गाडा अखेर रुळावर येणार आहे. महापालिकेतील शासन नियुक्त उपायुक्तांच्या नऊ पदांमधील पाच पदे रिक्त होती.
अखेर शासनाने त्यातील चार पदांवर उपायुक्तांची नेमणूक केली आहे. त्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त पदभार काढून घेत या उपायुक्तांकडे जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
यामध्ये आशा राऊत यांना परिमडळ क्रमांक ३ आणि प्राथमिक शिक्षण विभाग, चेतना केरुरे यांना परिमडळ क्रमांक ५, प्रशांत ठोंबरे यांना आकाशचिन्ह विभाग व परवाना विभाग, सुनील बल्लाळ यांच्याकडे सांस्कृतिक विभाग देण्यात आला आहे.
तर, गेल्या १४ वर्षांपासून अतिक्रमण नियंत्रण विभागाचा पदभार सांभाळत असलेले माधव जगताप यांच्याकडील सर्व खाती काढून घेण्यात आली असून, त्यांच्याकडे पूर्णवेळ महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाचे कामकाज देण्यात आले.
पुणे महापालिकेत उपायुक्त पदाच्या एकूण १८ जागा आहेत. त्यातील ९ उपायुक्त पालिकेतून आणि ९ उपायुक्तांची पदे राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीने भरली जातात. त्यातील राज्य सरकारकडील उपायुक्तपदाची पाच पदे रिक्त होती. त्यामुळे ठराविक अधिकाऱ्यांकडेच अनेक पदभार होते. परिणामी, नागरिकांची तसेच प्रशासकीय कामे रेंगाळली होती.