पिंपरी, दि. २६ – इंद्रायणी स्वच्छता अभियान अंतर्गत रिव्हर सायक्लोथॉन रॅली रविवारी (दि. २७) सकाळी साडेपाच ते साडेनऊ वाजताच्या सुमारास काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी साडेपाच ते साडेनऊ वाजताच्या कालावधीत भोसरी, तळवडे, निगडी वाहतूक विभागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबत सहायक आयुक्त सतीश माने यांनी आदेश दिले आहेत. ही रॅली तीन टप्प्यात काढली जाणार आहे. पहिला टप्पा पाच किलोमीटर – गावजत्रा मैदान-लांडगे पेट्रोल पंप-इंद्रायणी नगर-परत गावजत्रा मैदान असा आहे. दुसरा टप्पा १५ किलोमीटर – गावजत्रा मैदान-जय गणेश साम्राज्य चौक-क्रांती चौक-स्पाईन सिटी चौक-गवळी माथा-परत गावजत्रा मैदान असा आहे. तिसरा टप्पा २५ किलोमीटर – गावजत्रा मैदान-जय गणेश साम्राज्य चौक-साने चौक-कृष्णानगर चौक-स्पाईन सिटी चौक-गवळी माथा-परत गावजत्रा मैदान या मार्गावरून रॅली होईल.
वाहतुकीत बदल
पुणे-नाशिक महामार्गावर बाबर पेट्रोल पंप ते जय गणेश साम्राज्य चौक दरम्यान जाणारी लेन बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांनी नाशिक-पुणे महामार्गावरील जय गणेश साम्राज्य चौक (पांजरपोळ) ते बाबर पेट्रोल पंपाच्या दरम्यानच्या लेनमधून दुहेरी वाहतूक करावी.कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथून भोसरी स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग बंद असेल. या मार्गावरील वाहने चांदणी चौक, पीएमटी चौक येथून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येतील.
भोसरी अंडरब्रिज गावजत्रा मैदान येथून नाशिक महामार्गाकडे जाण्यास प्रवेश बंदी असेल. या मार्गावरील वाहने दिघी, भोसरी आळंदी रोडने येऊन नाशिक बाजूकडे जाणारी वाहने भोसरी ओव्हरब्रीजच्या उजव्या बाजूने जातील.
जय गणेश साम्राज्य चौक ते संविधान चौक (साने चौक) अशी स्पाईन रोडची दोन्ही बाजूची वाहतूक बंद असेल. या मार्गावरील वाहने बोऱ्हाडेवस्ती मोशी या मार्गाने जातील. स्पाईन रोडवरील सर्व्हिस रोडची वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्यात येईल.
टेल्को रोडने अनुकूल चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीस टाटा मोटर्स येथे प्रवेश बंद असेल. या मार्गावरील वाहने गुलाब पुष्प उद्यानाकडून इच्छित स्थळी जातील.
एचडीएफसी कॉलनी कडून घरकुलकडे येणारी वाहतूक घरकुलकडे न येता केएसबी चौकाकडून कुदळवाडी ब्रिजवरून जाईल.
थरमॅक्स चौकाकडून कृष्णानगरकडे येणारी वाहतूक कृष्णानगरकडे न येता दुर्गा चौक मार्गे त्रिवेणीनगर चौकाकडे वळून इच्छित स्थळी जातील.
संविधान चौकाकडे त्रिवेणीनगर कडून येणारी वाहतूक दुर्गा चौक मार्गे थरमॅक्स चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
स्पाईन रोडच्या सर्व्हिस रोडवरील अंतर्गत वाहतूक काही ठिकाणी सुरु राहील.