भुवनेश्वर : इस्त्रो तर्फे हाती घेण्यात आलेल्या चांद्रयान 2 या मोहीमेतील 98 टक्के उद्दीष्ठ साध्य झाले असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी आज येथे बोलताना दिली. विक्रम लॅंडरशी संपर्क प्रस्थपित करण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांनी अजून सोडलेले नाहींत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले की विज्ञान आणि तंत्राज्ञानाचा वापर या दोन आधारावर आम्ही या मोहीमेत 98 टक्के उद्दीष्ठ साध्य केले आहे. भुवनेश्वर आयआयटी मध्ये होणाऱ्या पदवीप्रदान सोहोळ्यासाठी ते येथे आले असताना विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. यापुढील चांद्र मोहीम आम्ही 2020 मध्ये हाती घेणार आहोत असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ही मोहीम मानवरहित असेल असे ते म्हणाले.
विक्रम लॅंडरचे नेमके काय झाले ते आम्हाला प्रथम शोधून काढायचे आहे असेही त्यांनी सांगितले. आम्ही चंद्राभोवती सोडलेला ऑर्बिटर एक वर्ष कार्यरत राहील अशी आमची सुरूवातीची योजना होता पण आता तो ऑर्बिटर आणखी सात ते साडे सात वर्ष तेथे कार्यरत राहू शकले असे त्यांनी सांगितले. ऑर्बिटर मध्ये एकूण आठ उपकरणे असून ती सर्व उपकरणे आपल्या नियोजित उद्दीष्ठानुसार कार्यरत आहेत असेही ते म्हणाले.