चांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)

भारताची बहुचर्चित चांद्रयान मोहीम आज काही किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे रद्द करावी लागली. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत इस्रोचे चांद्रयान अवकाशात झेपावणार होते. पण प्रत्यक्ष उड्डाण व्हायच्या केवळ 56 मिनिटे आधी यानाच्या क्रायोजनिक इंजिनातील एका टप्प्यात बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर केवळ धोका नको म्हणून ही मोहीम रद्द करावी लागली आहे. यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांचा आणि नागरिकांचा काहीसा हिरमोड होणे स्वाभाविक आहे.

तथापि, हे काही फार मोठे अपयश नाही. निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करणे ही आपल्या वैज्ञानिकांच्या पूर्ण आवाक्‍यातील बाब आहे. पुन्हा काही अवधीनंतर ही मोहीम आपण फत्ते करून दाखवणारच आहोत. त्यामुळे हे केवळ एक लांबलेले यश आहे एवढच त्याचा मतितार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या वैज्ञानिकांनी अंतरीक्ष संशोधन क्षेत्रात गेल्या काही दशकांमध्ये जी उत्तुंग कामगिरी करून दाखवली आहे ती पाहून साऱ्या जगाने तोंडात बोटे घातली आहेत.

अंतरीक्ष प्रक्षेपणात किंवा उपग्रह नियोजित कक्षेत नेऊन सोडण्याच्या कामात आपल्या वैज्ञानिकांनी इतके नैपुण्य मिळवले आहे की, हा आता त्यांच्या हातचा मळ झाला आहे. अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तितक्‍याच विश्‍वसनीयपणे भारत गेल्या अनेक वर्षांत अंतरीक्ष मोहिमा यशस्वी करत आला आहे. त्या आधारे आता आपण व्यापारी तत्त्वावर अन्य देशांचे उपग्रह अंतरिक्षात प्रक्षेपित करीत आहोत आणि त्याचा पुढचा टप्पा आपण गाठला असून आता आपण व्यापारी तत्त्वांवर अंतरीक्ष सेवा देणारी एक स्वतंत्र पीएसयू कंपनीच स्थापन करणार आहोत. भारताच्या वैज्ञानिकांनी अंतरीक्ष मोहिमांचे कौशल्य जितक्‍या निपुणतेने प्राप्त केले आहे त्यालाच त्यांनी जी काटकसरीचीही जोड दिली आहे तीही अजोड आहे.

जगातल्या अन्य कोणत्याही देशांपेक्षा भारताच्या अंतरीक्ष मोहिमा अत्यंत कमी खर्चात होत असतात. भारताने मंगळयान मोहीमही अशीच अत्यंत कमी खर्चात यशस्वी करून दाखवली होती. केवळ साडेचारशे कोटी रुपयांमध्ये ही मोहीम पार पडली, ही कौतुकाने गणली गेलेली बाब आहे. या साऱ्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर “चांद्रयान 2′ मोहिमेद्वारे इस्रोच्या यशात आणखी एक देदीप्यमान तुरा खोवला गेला असता. पण तांत्रिक अडचणीमुळे त्याला थोडा ब्रेक लागला आहे.

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार आज रद्द झालेली ही मोहीम आपण अगदी उद्याही पुन्हा सुरू करू शकलो असतो पण लांबलेल्या मोहिमेत अन्यही काही तांत्रिक निकष पुन्हा नव्याने तपासावे लागणार असल्याने ही मोहीम काही महिने लांबणीवर पडू शकते. 3.8 टन वजनाच्या चांद्रयान 2 स्पेस क्राफ्टमध्ये ऑरबिटर, लॅंडर आणि रोव्हर अशी तंत्रशुद्ध यंत्रणा होती व 640 टन वजनाच्या “जीएसएलव्ही मार्क 3′ या यानाद्वारे ती आज अवकाशात झेपावणार होती. या 640 टन वजनी यानाला इस्रोचे वैज्ञानिक बाहुबली या उपनामानेही संबोधतात.

उड्डाणाच्या दिवसापासून 54 मून डे मध्ये आपण प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलो असतो. वैज्ञानिक भाषेत पृथ्वीवरचे चौदा दिवस म्हणजे एक मून डे असे हे प्रमाण असते. चंद्रांच्या दक्षिण ध्रुवाच्या बाजूने रोव्हरने प्रत्यक्ष चंद्रभूमीवर उतरून तेथे प्रयोग सुरू केले असते. हे अंतर पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 84 हजार किमी इतके आहे. चंद्रावर याआधीही अन्य देशांच्या मोहिमा झाल्या आहेत. पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा मान केवळ भारतालाच मिळाला असता. आजची ही मोहीम यशस्वी झाली असती तर प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला असता. या आधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनाच असे यश मिळाले आहे.

मध्यंतरी इस्रायलनेही हा प्रयोग करून पाहिला होता; पण तो अपयशी ठरला होता. या मोहिमेचे आणखी एक अभिमानास्पद वैशिष्ट्य असे की, या मोहिमेतील प्रत्येक यंत्रणा भारतीय तंत्राने व बनावटीनी विकसित करण्यात आली आहे. इस्रोची ही सारी यंत्रणा अत्यंत कमी खर्चात कार्यरत असते. अगदी आकड्याच्याच भाषेत सांगायचे तर अमेरिकेच्या नासा या अंतरीक्ष संशोधन संस्थेचे बजेट हे इस्रोच्या तब्बल 20 पट अधिक आहे. हॉलीवूडच्या एखाद्या बिग बजेट चित्रपटाचे जेवढे बजेट असते त्याच्या निम्माही खर्च चांद्रयान मोहिमेला आलेला नाही. हा सारा उल्लेख आपल्यासाठी अभिमानास्पद आहेच; पण आजची ही मोहीम यशस्वी झाली असती तर हा उल्लेख आपण अधिक अभिमानाने करू शकलो असतो.

आजच्या मोहिमेला आलेले अपयश हे काहीसे मन खट्टू करणारे आहे हे नाकारता येणार नाही. अर्थात, आज ना उद्या आपण ही मोहीम फत्ते करणारच आहोत, पण त्यावरूनही देशातल्या काही महाभागांनी राजकीय संदर्भ जोडून जी ओरड सुरू केली आहे ती अधिक वेदनादायी आहे. ही मोहीम यशस्वी ठरली असती तर मोदी समर्थकांनी त्याचे श्रेय मोदी सरकारला देत जो जल्लोष केला असता तो लक्षात घेऊन मोदी विरोधकांनी सोशल मीडियावर या फसलेल्या मोहिमेची थट्टा करायलाही मागे पुढे पाहिलेले नाही. काहींनी याचा संबंध थेट सरकारशी जोडून या सरकारला साधे यान उडवता येत नाही काय? असा विनोदी सवाल उपस्थित केला आहे. वास्तविक वैज्ञानिक मोहिमा किंवा लष्करी मोहिमांशी राजकारणाचा संबंध जोडणे अनाठायी असते.

अशा मोहिमा साऱ्या देशवासियांसाठी गौरवास्पद असतात. त्यातील यशापयश हे आपल्या साऱ्यांचेच असते. त्यासाठी ना उमेद किंवा नैराश्‍य व्यक्‍त करणाऱ्या प्रतिक्रिया आपण टाळायला हव्यात. अशा मोहिमांमध्ये जे भारतीय तंत्रज्ञ आपला जीव ओतून योगदान देत असतात, त्यांचे मनोबल कायम राहील याची दक्षता आपण सगळ्यांनीच घ्यायची असते. आज लांबणीवर पडलेल्या चांद्रयान मोहिमेचे अपयश भारतीय वैज्ञानिकांच्या कर्तृत्वावरील ठपका नाही, हा केवळ एक तांत्रिक बिघाडाचा भाग आहे. त्यातून इस्रोच्या वैज्ञानिकांचे उणेदुणे काढता येणार नाही. येत्या काही दिवसांत चांद्रयान पुन्हा निश्‍चितपणे अवकाशात दैदिप्यमान भरारी घेईल या विषयी शंका नाही. आजच्या किरकोळ तांत्रिक बिघाडाने आपले यश थोडे लांबणीवर पडले आहे, एवढेच आपण आज म्हणू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.