नवी दिल्ली: भारताचे चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर स्लीप मोडमध्ये आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 14 दिवसांच्या शोधानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सूर्यास्तानंतर दोन्ही उपकरणे बंद केली आहेत. मात्र सूर्योदयानंतर त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
त्यानुसार आज चांद्रयान-3 मिशनचे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमधून बाहेर येणार आहेत. 16 दिवस स्लीप मोडमध्ये राहिल्यानंतर आज ISRO लँडर आणि रोव्हर सक्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहे. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्ह रपुन्हा एकदा सक्रिय झाल्यास आणखी नवीन माहिती उपलब्ध होऊ शकते.
चंद्रावर सूर्यप्रकाश येणार असल्याने लँडर आणि रोव्हरवरील सोलर पॅनेल चार्ज होण्याची शक्यता आहे. सौर पॅनेल सूर्यप्रकाशाने चार्ज होणे अपेक्षित आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. या ठिकाणी आज दिवस उजाडेल आणि सूर्यकिरणे येणार आहे. त्यामुळे रोव्हर आणि लँडरचे सोलर पॅनेल चार्ज होण्याची शक्यता आहे. रोव्हर आणि लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रो सज्ज झाले आहे.
चंद्रावर सध्या विक्रम लँडर असणाऱ्या शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश पडत आहे. हा सूर्यप्रकाश 13 डिग्री या अँगलने पडत आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्ही डिव्हाईस 6 ते 9 डिग्री अँगलच्या सूर्यप्रकाशामध्ये काम करू शकतात. मात्र याबाबत खात्रीशीर कोणतीही माहिती अद्याप दिली जाऊ शकत नाही.
14 दिवसांची यशस्वी कामगिरी पूर्ण
इस्रोने चंद्रयान-3 मोहीम यशस्वी करत मोठा इतिहास रचला. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर 23 ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग केले होते. त्यामुळे दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. चंद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडरने आपला 14 दिवसांची यशस्वी कामगिरी पूर्ण केली आहे. त्यानंतर इस्त्रोने 2 सप्टेंबर रोजी प्रज्ञान रोव्हरला आणि 4 सप्टेंबर रोजी विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते.