Chandrayaan-3 : चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा जगातील पहिला देश बनला आहे. या यशाबद्दल भारताला आता आणखी एक गौरव प्राप्त झाला आहे.
इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने चांद्रयान-3 मोहिमेला जागतिक अंतराळ पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारताशिवाय आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आहे.
इटलीतील मिलान येथे 14 ऑक्टोबर रोजी 75व्या इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉटिकल काँग्रेसच्या उद्घाटन समारंभात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग केले होते. त्यानंतर जवळपास वर्षभरानंतर भारताच्या या मोहिमेला हा बहुमान मिळत आहे, हे उल्लेखनीय.
वैज्ञानिक जिज्ञासा आणि किफायतशीर अभियांत्रिकी याचा समन्वय म्हणजे, इस्रोची चांद्रयान-3 मोहीम आहे. चांद्रयान -3 हे उत्कृष्ट मोहिमेबाबत भारताची असलेली वचनबद्धता तसेच अंतराळ संशोधनाच्या माध्यमातून मानवतेला मिळणाऱ्या प्रचंड क्षमतेचे प्रतीक आहे.
या मोहिमेद्वारे चंद्राची संरचना आणि पूर्वी न पाहिलेले पैलू उघड करणारा हा वैश्विक ठेवा आहे, असे फेडरेशनने म्हटले आहे. भारताच्या अंतराळ आणि आण्विक क्षेत्रांचा यशस्वी समन्वय हा चांद्रयान-3च्या अनेक यशांपैकी एक ठऱला आहे.
यामध्ये मिशनचे प्रोपल्शन मॉड्युल अणू तंत्रज्ञानाने चालवले होते. चांद्रयान-3 लँडिंगच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.