नवी दिल्ली – इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी संध्याकाळी चांद्रयान-2 ची कक्षा चौथ्यांदा यशस्वीरित्या बदलली. चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजून 27 मिनिटांनी चांद्रयान-2 च्या कक्षेत यशस्वीरित्या बदल करण्यात आला असून चांद्रयान-2 पृथ्वीपासून किमान (पेरिजी) 277 किमी आणि कमाल (एपोजी) 89 हजार 472 किमी अंतरावर स्थिरावण्यात आले. आता 6 ऑगस्ट रोजी चांद्रयानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येणार आहे.
प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान 2 ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान 2 मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता पुढचा कक्षा बदल सहा ऑगस्टला करण्यात येणार आहे.
14 ऑगस्टला चांद्रयान 2 चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होईल. 20 ऑगस्टला चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. तीन सप्टेंबरला विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लॅंडर चंद्रावर उतरेल.