मुंबई : आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमा दरम्यान म्हटले होते. परंतु, त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच ज्या कार्यक्रमात ते बोलले होते तो एक व्हिडीओही डिलीट केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी,”आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी केलं होतं. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपाने केलेल्या तयारीचा उपयोग होईल.” असे मोठे वक्तव्य एका खासगी कार्यक्रमदरम्यान केले होते.
बावनकुळेंनी हे वक्तव्य केल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, यामुळे शिंदे गटाशी बिनसण्याची शक्यता असल्याचे लक्षात येताच सर्व ठिकाणांवरुन हा व्हिडिओ हटवण्यात आला. त्यानंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्याबाबत स्पष्टीकरण दिले.
“आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढविण्याचा विचार करीत असल्याचे वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना आणि सज्ज रहावे, यासाठी केले होते. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या निवडणूक तयारीचा उपयोगच होईल,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.