मुंबई – चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे जोरगेवार यांनी निवडणुकीत भाजपचे उमेदवार नानाजी शामकुळे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र, त्यांनी आता भाजपला पाठिंबा जाहीर करताच त्यांच्यावर समाजमाध्यमांवर मतदारांनी टिकेची आणि शिव्यांची लाखोली वाहिल्याचे पहायला मिळत आहे.
Independent MLA from Chandrapur Assembly Constituency Kishor Jorgewar met to handover unconditional support letter with leaders from Chandrapur. pic.twitter.com/cJou8WlpCy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 30, 2019
दरम्यान, जनमत विरोधात जात असल्याचे बघून समर्थकांची बैठक बोलावून भाजपसोबतच इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. मात्र, विकासासाठी मुख्यमंत्र्यांसोबत राहील, अशी भूमिका आपण घेतल्याचे जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत भाजपला एकूण 9 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे भाजपच संख्याबळ 105 वरुन 114 जागांवर पोहोचल आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर या भेटीचे छायाचित्र फडणवीस यांच्या कार्यालयाने सोशल मीडियावर सार्वजनिक केले. त्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असा स्पष्ट उल्लेख होता. परिणामी, जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. सोशल मीडियावर जोरगेवार यांची खिल्ली उडवतानाच हा जनाधार भाजपाविरोधी होता. आता जोरगेवारच भाजपात प्रवेश करीत असेल तर हा मतदारांचा अपमान आहे, अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका सुरू झाली.
त्यानंतर, चंद्रपूरची जनता विरोधात जात असल्याचे बघून जोरगेवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की “निवडणुकी दरम्यान मी जनतेला दिलेला प्रत्येक शब्दाची मला आठवण आहे. मी काहीही विसरलो नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते याप्रसंगी बोलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावल, मी त्यांच्या विनंतीला मान देत त्यांची भेट घेतली. यावेळी मी कोणताही पक्ष प्रवेश केलेला नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, त्यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे”.