भयंकर! बेड न मिळाल्याने रुग्णाचा स्वत:च्या गाडीतच मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालय परिसरात टाहो

चंद्रपूर – महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज विक्रमी वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्ससाठी वेटिंगवर रहावे लागत आहे. अशातच रुग्णालयाच्या चकरा मारूनही बेड न मिळाल्याने रुग्णाचा स्वत:च्या गाडीतच मृत्यू झाल्याची करोना स्थितीची भीषणता अधोरेखित करणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडलीय.

सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर येथील रहिवाशी प्रविण दुर्गे (वय – 40) यांचा करोना टेस्ट रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला होता. प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाइकांनी संपूर्ण शहर फिरले मात्र, कुठेही त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. उपचार आणि बेड मिळावा यासाठी ते रुग्णालयात सतत फेऱ्या मारत होते. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. अरेख बेड न मिळाल्याने आज (सोमवार) पहाटे स्वत:च्या गाडीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला.

बेडअभावी लागोपाठ दोन दिवस चंद्रपुरात मृत्यू –

दुसरीकडे, उपचार न मिळाल्यामुळे चंद्रपूरात बस स्थानकावरच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. गोविंदा निकेश्वर (वय50, ब्रम्हपुरी) यांना करोनाची लागण झाली होती. करोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्यासाठी गेले. त्यांना आभोरा येथून ब्रम्हपुरी येथील कोविड रुग्णालयात आणण्यात आले मात्र, तिथेही बेड शिल्लक नव्हते. गोविंदा यांना कोणत्याच रुग्णलायत भरती करून घेण्यात आले नाही. कुठेही बेड न मिळाल्याने रात्री ते ख्रिस्तानंद रुग्णालयासमोरील बसस्थानकावर आले तेथेच त्यांनी पत्नीसमोर अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, राज्यात करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारकडून अधिकचे बेड उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी राखीव निधी घोषीत करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यात संचारबंदी लागू असतानाही रुग्णसंख्या वाढतच असल्याने आता सरकारकडून संपूर्ण लाॅकडाऊन लागू करण्याची चिन्हे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.