मुंबई – आम्हाला पक्षाने भरपूर काही दिले हे मला मान्य आहे. मग आम्ही पक्षासाठी काहीच केले नाही का? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. त्याचबरोबर भाजपसाठी चंद्रकांत पाटील यांचे शून्य योगदान असून विद्यार्थी परिषदेत त्यांचे मोठे योगदान आहे. तरी देखील भाजपने त्यांचा स्वीकार केलाच ना, असा टोलाही त्यांनी लगाविला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या कारणमिमांसानंतर एकनाथ खडसे यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. खडसे म्हणाले, माझ्या घरात फक्त मला आणि माझ्या सुनेलाच भाजपकडून उमेदवारी दिली असून विधानसभेला माझ्या मुलीला भाजपने दिलेली उमेदवारी मी मागितली नव्हती. मी वारंवार त्यांना माझ्या मुलीला तिकीट देऊ नका, असे सांगितले होते. तरी देखील जबदस्तीने त्यांनी माझ्या मुलीला तिकीट दिले, म्हणजे आमच्यावर उपकार केले नाहीत.
खडसे म्हणाले, एकासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा निकष हे मला पटत नाही. चंद्रकांत पाटलांचा आदर करतो. त्यांनाच विचारायचे आहे की, उभा महाराष्ट्र पिंजून काढला, तळागाळात पोहोचलो, आंदोलने केली. पक्षात 40 वर्षे काम करत होतो, तेव्हा चंद्रकांत पाटील भाजपमध्ये होते का? ते विद्यार्थी परिषदेत होते. तरीही विद्यार्थी परिषद ही भाजप परिवारातील संघटना आहे म्हणून अध्यक्ष म्हणून मान्यता मिळाली की नाही? त्यांचे भाजपमध्ये शून्य योगदान आहे.
विद्यार्थी परिषदेत त्यांचे मोठे योगदान आहे. तरी देखील त्यांचा भाजपने स्वीकार केलाच ना. त्याचबरोबर कोणत्या मेरिटवर गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली असा सवाल त्यांनी केला.