मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची फेरनियुक्ती
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्यानंतरही भाजपाने ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील व मंगलप्रभात लोढा यांच्यावर कायम विश्वास ठेवला आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मुंबई अध्यक्ष म्हणून आमदार मंगलप्रभात लोढा यांची फेरनियुक्ती केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरूवारी या नियुक्त्यांची घोषणा केली.
विधानसभा निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारमुळे राज्यातील राजकिय समिकरणे बदलली गेली. यापार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षपदावर भाजपमधील अनेक नेत्यांचा डोळा होता.
भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन आदींची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाने केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
मुंबईच्या अध्क्षपदासाठी आशीष शेलार, खासदार मनोज कोटक यांची नावे चर्चेत होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला अंगावर घेणारा अध्यक्ष द्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र, पक्षाने मुंबईची जबाबदारी पुन्हा लोढा यांच्याकडे दिली.
नवी मुंबईत रविवारी भाजपाचे राज्यव्यापी अधिवेशन
रविवार, 16 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात चंद्रकांत पाटील हे आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. या अधिवेशनात महाराष्ट्रातील पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा कार्यकर्ते व जनतेला देण्यात येईल.
विधानसभा निवडणुकीत जनादेश मिळूनसुध्दा शिवसेनेने जनादेशाचा अपमान करुन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ पकडल्यामुळे जे नवीन राजकीय समीकरण महाराष्ट्रात निर्माण झाले त्या बाबतची स्पष्ट दिशा आणि आगामी कामाची योजना या अधिवेशनात ठरविण्यात येणार आहे. या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.