पुणे: ब्राम्हण महासंघाने चंद्रकांत पाटील यांना अद्याप पाठिंबा दिला नाही, असे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी जाहीर केल्याने पाटील पुन्हा अडचणीत सापडले आहेत. तसेच महासंघाने पाठिंब्याचे पत्रक परस्पर काढल्याबद्दल दवे यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाला होता. तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध उमेदवार देण्याचा इशारा दिला होता.
या सगळ्या घडामोडींनंतर शनिवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून परिपत्रक काढून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. यावेळी ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत पाटील यांची बैठक झाल्याचेही सांगितले जात होते. चंद्रकांत पाटील यांनीही आपल्याला ब्राह्मण महासंघाचा विरोध नाही, असे सांगितले होते.
काहीवेळातच पुन्हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून आपण अद्याप चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आमच्या संघटनेचे प्रवक्ते आनंद दवे यांनी परस्पर चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिल्याचे परिपत्रक काढले. परस्पर असे पत्रक काढल्याबद्दल दवे यांची संघटनेतून हकालपट्टी केली जाईल, असे गोविंद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे कोथरूडच्या मतदारांमधील संभ्रम आणखी वाढण्याची शक्यता आहे. याठिकाणी विरोधकांकडून एकमताने मनसेच्या किशोर शिंदे यांच्या पाठिशी ताकद उभी करण्यात आली आहे.