पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नुकतीच पिंपरी चिंचवड येथे मेट्रोचा प्रवास केला. पवारांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिकेपर्यंतचा प्रवास केला होता. मात्र यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का ?असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. ते पुढं म्हणाले की, पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार, आमदाराला न कळवता राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांच्या कशी होऊ शकते, असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला. ते मुंबईत भाजपा प्रदेश मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात पंधरा वर्षे आणि देशात दहा वर्षे सरकार असताना हा प्रकल्प रखडला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाच्या सर्व परवानग्या मिळवून काम सुरू करण्यात आले. पुणे मेट्रो हा अकरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे व त्यामध्ये थेट सहभाग आणि कर्जाला हमी असा केंद्र सरकारचा आठ हजार कोटी रुपयांचा वाटा आहे.
मेट्रोच्या एका टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे ठरले होते. पण करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अशा स्थितीत शरद पवारांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी करणे व त्यांच्यामुळे प्रकल्प झाल्याचे भासविणे हा आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार, असलाचं पाटील यांनी नमूद केलं.
मेट्रोची चाचणी करायची होती तर त्यासाठी केवळ शरद पवार यांना का निमंत्रित केले असा आपला मेट्रो प्रशासनाला सवाल आहे. पुण्यात आठ विधानसभा सदस्य आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये तीन विधानसभा सदस्य आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट आहेत. माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर हे पुण्याचे निवासी आहेत. मेट्रो प्रशासनाला उद्घाटनपर धाव घ्यायची होती तर त्यांनी या सर्व लोकप्रतिनिधींना तसेच पुण्याच्या महापौरांना सन्मानाने सहभागी करायला हवं होतं. त्यांनी केवळ एका नेत्याला श्रेय देण्याचा का प्रयत्न केला, असा आपला सवाल पाटील यांनी उपस्थित केला.