पूरग्रस्त नागरिकांनी प्रश्न विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात “ए गप्प..’

कोल्हापूर, (प्रतिनिधी) – पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर आला आणि अनेक गावे वाहून गेली. यामध्ये अनेकांची संसार उद्‌वस्त झाली आहेत. दरम्यान पूरग्रस्त परिसराची पाहणी करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सेल्फी काढला. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. आता त्या पाठोपाठ कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही अशीच टीका होत आहे.

कोल्हापुरात पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना एका पूरग्रस्ताने चंद्रकांत पाटील यांना शेतीच्या सातबाऱ्यासंबंधी विचारला. मात्र चंद्रकांत पाटलांनी त्यांना “ए गप्प’ म्हणत त्याला खाली बसवले. चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्ताला अशी वागणूक दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

चंद्रकांत पाटील कोल्हापूरातील पूरग्रस्तांची संवाद साधत होते. “शिरोळ मधून रोड सुरु झाला तर आपल्याला जे हवं ते आणता येऊ शकते. म्हणून मी आपणा सर्वांना प्रार्थना करेन की विचलित न होता, न घाबरता. सरकार पूर्णपेणे आपल्या पाठिशी आहे. याची खात्री बाळगा. तक्रारी करुन काही होणार नाही. सूचना करा, प्रशासनाला तक्रारी करुन काय होणार? बिचारे 24-24 तास झोपलेले नाहीत.

तसेच येथे सर्व आरोग्य सुविधा मिळतील. गुरांसाठी चारा मिळेल.’ असेही चंद्रकांत पाटील बोलत होते. त्याच दरम्यान लोकांमध्ये बसलेला एक पूरग्रस्त उभा राहून आपली व्यथा मांडायला लागला. चंद्रकांत पाटील यावेळी त्याला “सगळे करतो’ असे म्हणाले. मात्र तरीही त्याचे बोलणे सुरूच असल्याचे पाहून शेवटी त्यांना “ए चूप बस’ म्हणत म्हणत खाली बसायला सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्तांला केलेली अरेरावी पाहून पूरग्रस्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.