राष्ट्रवादीतील घराणेशाहीमुळेच पक्षांतर : चंद्रकांत पाटील

“त्या’ सर्वांचा हिशोब चुकता केला जाणार

कोल्हापूर, (प्रतिनिधी)  – बारामती लढवायला तुम्हाला मुलगीच लागते, मावळ लढवायला पार्थ लागतो. महाराष्ट्रात सतत तुम्ही वर्षानुवर्षे घराणेशाही चालविली. तेव्हा लोकांना पर्याय नव्हते म्हणून ते तुमच्याकडे राहिले, आता पर्याय उपलब्ध आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही झाल्यामुळेच लोक आता पक्षांतर करत आहेत, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

दर 10 दिवसांनी बॉम्ब फुटणार…
कुणालाच पुढं येवू द्यायचे नाही, ही तुमची परंपरा आहे. तुमच्या काळात सर्वसामान्य लोकांना बॅंकेत खाते उघडू दिले नाही, पण आमच्या सरकारने सर्वसामान्यांना खाती उघडून दिली. 50 हजार कोटी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले. हे आधी होत नव्हते; पण आता होते आहे. येत्या 31 तारखेला मुंबईमध्ये मोठे बॉम्ब फुटणार आहेत. हे बॉम्ब दर दहा दिवसांनी सतत फुटत राहणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.

माजी मंत्री भरमू सुबराव पाटील माजी नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला त्या प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र वर्षानुवर्षे दोनशे ते अडीचशे घराण्याने लुटला आहे. भाजपचे मजबूत सरकार येत्या काळात सत्तेवर येणार आहे. हे सरकार आल्यानंतर ज्याने महाराष्ट्र लुटला त्या सर्वांचा हिशोब चुकता केला जाणार आहे.
आजच शरद पवार यांनी पत्रकार बैठक घेतली, त्यांनी सांगितले “इन्कम टॅक्‍स’ची भीती घालून लोकांना भाजपात घेतले जाते आहे. मुळात भाजप कुणालाही इन्कम टॅक्‍स आणि ईडीची भीती घालत नाही. मुळात तुम्हालाच तुमच्या लोकांना सांभाळता येत नाही, त्याला आम्ही काय करणार? आणि उगाचच आरोप आमच्यावर केले जातात. असे आरोप करून सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)