पुणे – मेट्रोच्या कामामुळे बाणेर, पाषाण आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही कोंडी दूर व्हावी यासाठी वाहतुकीचे नियोजन करून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी नागरिकांना सांगितले.
बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना विविध समस्यांचा पाढा वाचण्यात आला. कोथरूड मतदारसंघात या परिसराकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, नाल्यांची अस्वच्छता यासह अन्य समस्या उद्भवत आहे. त्यावर मोकाटे यांनी या परिसरातील समस्या प्रथम प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे अश्वासन दिले.
हिंजवडी आयटी पार्क आणि मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना नागरिकांना एक ते दोन तास वेळ जातो. त्यामुळे ही कोंडी सोडविण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. त्याबाबत वाहतूक पोलिसांशी चर्चा करून परिसर कोंडीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल.
दरम्यान, कोथरूड परिसरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून दुचाकी रॅलीला सुरवात झाली. यावेळी हातातील पेटत्या मशालीने संपूर्ण मतदारसंघ उजाळून निघाला. डहाणूकर काॅलनी, गणंजय सोसायटी, परमहंस नगर, शिक्षकनगर, शिवतीर्थनगर, रामबाग काॅलनी, बेडेकर गणपती, आयडीयल काॅलनी, मयुर काॅलनी, मृत्युंजय मंदिर मार्गे रॅली स्मारकाजवळ संपली.
मतदारसंघातील लोकसंख्या वाढली, मात्र त्या तुलनेत विकासाला गती मिळाली नाही. बाणेर, बालेवाडी परिसरात रूग्णालय उभारण्याचा मानस आहे. कोथरूड परिसरातही सर्व सोयी-सुविधांयुक्त रूग्णालय उभारणार, असल्याचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.