भाजप जिल्हा कार्यकारिणीचा निर्णय, मतदानाचा टक्का वाढविण्याबाबतची रणनीती
सातारा – सातारा नगरपालिकेच्या भाजपच्या स्वीकृत नगरसेवकपदाची निवड थेट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील करणार असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. प्रत्येकी पाच बूथची जबाबदारी जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांवर देऊन मतदानाचा टक्का वाढविण्याबाबतची रणनीती भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत आखण्यात आली.
पक्षांतर्गत कलहामुळे इच्छुकांच्या उड्या
राजघराण्यातील मनोमिलनाचा कच्चा धागा तुटल्यानंतर सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी असे दोन गट तयार झाले. त्यामध्ये संधी हुकल्याने काहींनी भाजप प्रवेश करून पालिकेत कमळ उमलविले. नगरसेवक विजय काटवटे, मिलिंद काकडे, धनंजय जांभळे, प्राची शहाणे, सिध्दी पवार या सहा जणांनी पालिकेत प्रवेश केला. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदाचा दावेदार ठरलेल्या भाजपने पहिल्या टप्प्यात ऍड. खामकर आणि दुसऱ्या वेळी सागर पावशे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही, अशी टीका होऊ लागली. त्यामुळे यावेळी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे असा आग्रह धरला जात आहे. तेव्हापासून सातारा शहर भाजप अंतर्गत कलहाला सुरुवात झाली आहे.सातारा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदावर भाजपमधून धीरज घाडगे, महेंद्र कदम, अप्पा कोरे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार अशी इच्छुकांची यादी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तयार केली आहे. मात्र, याचा अंतिम निर्णय चंद्रकांत पाटीलच घेणार आहेत. स्वीकृत नगरसेवक नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निष्ठावंत वादापेक्षा बूथ बांधणीचा काथ्याकूट झाला. भाजप अडचणीत असताना उर्जितावस्था आणण्याचे काम प्रामाणिकपणे केले, त्यांनाच स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी द्यावी, असा सूर निष्ठावंतामध्ये आहे.
भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात झाली. जिल्हाध्यक्ष विकम पावसकर, शेखर वढणे, भाजपचे गटनेते मिलिंद काकडे, धनंजय जांभळे, विजय काटवटे, सिध्दी पवार, प्राची शहाणे, ऍड. प्रशांत खामकर उपस्थित होते. शेखर वढणे यांनी बैठकीत बूथानिहाय आढावा घेतला. पावसकर यांनी बैठकीला संबोधित करत विधानसभा निवडणुकांच्या तयारीत बूथ बांधणीचे महत्व सांगितले.
“”प्रत्येकी पाच बूथ सदस्यांनी वाटून घ्यावेत. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत वीसपेक्षा कमी मतदान झालल्या बूथला “ए प्लस’मध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना आहेत. महिला आघाडी मोर्चालासुध्दा प्रत्येक बूथमधून किमान पंचवीस राख्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
याशिवाय बूथ व विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ता मेळावे व शक्ती गटप्रमुखांच्या बैठका येत्या जुलै महिन्यात होणार आहेत,” अशी माहिती पावसकर यांनी दिली. वीसपेक्षा कमी मतदान झालेल्या 550 बूथवर विशेषत्वाने काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. निष्ठावंताना भाजप स्वीकृत नगरसेवकपदावर वर्णी लागली पाहिजे, अशी जोरदार मागणी पुढे आली. स्वीकृतसाठी इच्छुक पदादिकाऱ्यांनी आपले अर्ज जिल्हा कार्यकारिणीकडे द्यावेत. त्यावर प्रदेश कार्यकारिणी निर्णय देईल व चंद्रकांत पाटील अंतिम करतील त्यांची निवड करण्याचा निर्णय मान्य करण्यात आला.